लोटेत तीन महिन्यात चार मोठ्या दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:30 AM2021-03-21T04:30:11+5:302021-03-21T04:30:11+5:30
आवाशी : महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीकडे पाहिले जाते. मात्र गेल्या ...
आवाशी : महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीकडे पाहिले जाते. मात्र गेल्या तीन महिन्यातील आग व स्फोटांच्या तीन घटना घडल्याने या वसाहतीमधील कामगार व परिसरातील रहिवासी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न घरडा कंपनीतील स्फोटानंतर पुन्हा एकदा उभा राहिला आहे.
मागील तीन महिन्यातील ही चौथी मोठी घटना आहे. प्रथम येथील दुर्गा फाईन या कंपनीला आग लागून संपूर्ण कंपनी बेचिराख झाली. ही घटना जुनी होत असतानाच येथील लासा सुपर जेनेरिक (जुनी उर्ध्वा) या कंपनीच्या डेरा पेण्ट या बंद प्लँटमध्ये कचऱ्याला आग लागून हाहाकार उडाला. ही घटना ताजी असतानाच सोमवार दिनांक १५ रोजी येथील सुप्रिया लाईफ सायन्सेस या कंपनीत आग लागून तीन कामगार भाजले गेले. या चार दुर्घटनांमधील कामगार बरे होण्याआधीच केवळ पाच दिवसाच्या अंतराने येथील नामांकित गणल्या जाणाऱ्या घरडा केमिकल्स कंपनीत स्फोट होऊन चार कामगार मृत्युमुखी पडले तर एक जण मरणाच्या दारात उभा आहे. त्यामुळे खरोखरच येथील सुरक्षितता अबाधित आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुळात येथील औद्योगिक वसाहत ही पूर्णपणे रासायनिक स्वरूपाची आहे. त्यामुळे येथे छोटे-छोटे अपघात दैनंदिन सुरू असतात. येथील कंपनी व्यवस्थापन व मालक हे कामगार व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यापेक्षा त्यांच्या उत्पादनाला प्राधान्य देतात, ही बाब दुर्दैवाने खरी आहे. अपघात घडल्यानंतर याचे कारण शोधणारे शासनाचे सुरक्षा निरीक्षक हे येथून दोनशे किलोमीटरच्या अंतरावर आहेत. अपघात घडला की ते चार तासात इथे पोहोचतात खरे; पण नेमकी काय तपासणी करतात, हे कधीच उघड केले जात नाही. खरे तर कंपनी व्यवस्थापनाबरोबरच ते अशा घटनांना जास्त जबाबदार आहेत. नियमानुसार कंपनीची वेळोवेळी त्यांच्याकडून तपासणी होत असेल तर असे जीवघेणे अपघात घडतातच कसे?
या यंत्रणांच्या उदासीनपणाइतकाच गंभीर विषय म्हणजे शासनाचे इतर अधिकारी व लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे आमदार, खासदार, पालकमंत्री, पर्यावरण मंत्री यांची भूमिका. इथली सुरक्षितता अबाधित राहील, या दृष्टीने त्यांनी आतापर्यंत काय पुढाकार घेतला, या प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड आहे. अपघात घडल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाला भेट देणे व त्याचबरोबर त्या अपघातात मृत वा जखमी झालेल्यांच्या नातेवाइकांना सांत्वन करण्यासाठी भेट देणे, या पलीकडे काहीच घडत नाही.
घरडा येथील मृतांच्या नातेवाइकांना कंपनी भरभरून नुकसान भरपाई देईल. मात्र ज्याच्या कुटुंबात जी पोकळी निर्माण झाली आहे ती त्या भरपाईने भरून निघेल का? या कंपन्यांचे व्यवस्थापन व कोल्हापूर येथील सुरक्षा विभागाने काय तपासणी केली, कंपनी सुरू करण्यापूर्वी तिची सुरक्षा यंत्रणा अद्ययावत आहे की नाही, हे तपासले जाते का? वेळोवेळी करण्यात येणाऱ्या तपासण्यांचा अहवाल, त्यात असणारे दोष हे स्थानिक स्तरावर वा प्रसार माध्यमांकडे प्रकाशित करून संबंधित कंपनीवर योग्य ती कडक कारवाई केली जाते की नाही, हे तपासण्याची जबाबदारी यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री यांनी पेलायला हवी. अपघात घडल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना काही दोष सापडले का, त्यानुसार कंपनीवर कारवाई झाली का, ही माहिती कोठेही पुढे येत नाही. त्यामुळे अशी कारवाई होते की नाही, हेही शंकास्पद वाटते.
अशा मोठ्या दुर्घटना घडल्यानंतर त्याचे गांभीर्य लक्षात येते. अशावेळी लोकप्रतिनिधी आवर्जून येतात. मात्र इथे काम करणारा कामगार, वसाहतीनजीक राहणारे रहिवासी हे सुरक्षित आहेत का, याचा आढावा नियमितपणे घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री यांनी लक्ष देणे येथील लोकांनाही अपेक्षित आहे.