आई-वडिलांसह दोन मुलांना एकाच सरणावर शेवटचा निरोप, गाव गेलं गलबलून; रायगड जवळ अपघातात ठार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 01:43 PM2023-01-21T13:43:53+5:302023-01-21T13:44:20+5:30

पंडित कुटुंबाला काळाने एकाचवेळी आपल्यासोबत नेले

Four members of the Pandit family in Guhagar were burnt on the same pyre, Killed in an accident near Raigad | आई-वडिलांसह दोन मुलांना एकाच सरणावर शेवटचा निरोप, गाव गेलं गलबलून; रायगड जवळ अपघातात ठार 

आई-वडिलांसह दोन मुलांना एकाच सरणावर शेवटचा निरोप, गाव गेलं गलबलून; रायगड जवळ अपघातात ठार 

googlenewsNext

गुहागर : ज्याच्या आयुष्याला स्थैर्य येत होतं, असा ४२ वर्षीय नीलेश, त्याची ३५ वर्षांची पत्नी नंदिनी, १२ वर्षांची लेक मुद्रा आणि अवघ्या चार वर्षांचा चिमुरडा भव्य, या पंडित कुटुंबाला काळाने एकाचवेळी आपल्यासोबत नेले. स्मशानभूमीत दोनच शवदाहिन्या असल्याने या चौघांनाही एकाच सरणावर ठेवून शेवटचा निरोप देताना अख्खा गाव गलबलून गेला. कुणाच्याही काळजाचा ठोका चुकवेल, असा प्रकार गुहागर तालुक्यातील हेदवीवासीयांनी प्रथमच अनुभवला.

रायगड जिल्ह्यातील गोरेगाव रेपोली येथील अपघातात दहा जण ठार झाल्यानंतर सकाळपासूनच हेदवी गावात सन्नाटा पसरला होता. यामधील जाधव व पंडित कुटुंबीयांपैकी सात जणांना रात्री साडेअकरा वाजता शोकाकुल वातावरणात अग्नी देण्यात आला. हेदवी जुवेवाडी येथील मनोहर जाधव यांच्या आईचे वर्षश्राद्ध असल्याने गुरुवारी रात्री उशिरा मुंबई येथून जाधव व पंडित कुटुंबीय निघाले. शुक्रवारी पहाटे पाच वाजता झालेल्या अपघातात या दहा जणांना मृत्यूने गाठले.

पोलिस तपास प्रक्रिया व विच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी मृतदेह ताब्यात देण्यात आले. यामध्ये अमोल, दिनेश, निशांत जाधव व नीलेश, नंदिनी, मुद्रा व भव्य पंडित या सात जणांना हेदवी येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्याचे ठरले. नीलेश पंडित हे हेदवी गावचे जावई असून, डावखोल (तालुका संगमेश्वर) हे त्यांचे मूळ गाव आहे. गावात घरचे कोणी नसल्याने त्यांच्यावरही हेदवी येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुक्रवारची सकाळ गावाला अपघाताच्या बातमीने धक्का देऊन गेली. मात्र, इतके मृतदेह एकाचवेळी स्मशानभूमीत आल्याने रात्र अधिकच भयाण वाटत होती. रात्री नऊ वाजता हे सातही मृतदेह घरी आल्यानंतर एकच आक्रोश झाला. वेगवेगळ्या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात नातेवाईक आले होते. संपूर्ण गाव त्यांना निरोप देण्यासाठी जमला होता.

हेदवी समुद्रकिनारी उमामहेश्वर मंदिरासमोर एकमेव स्मशानभूमी आहे. येथे दोन शवदाहिनी आहेत. त्यांची अवस्था दयनीय असल्याने एकाच वेळी सात जणांवर अग्निसंस्कार कसा करायचा? असा पेच ग्रामस्थांसमोर पडला होता. अखेर मोठी चिता रचून नीलेश, नंदिनी, मुद्रा व भव्य या पंडित कुटुंबातील चौघांना एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. मुलगी, जावई व दोन लहानग्या नातवांना अग्नी देण्याची वेळ रघुनाथ जाधव यांच्यावर आली. अन्य मृतदेहांना स्वतंत्रपणे सरण रचून अग्नी देण्यात आला.

Web Title: Four members of the Pandit family in Guhagar were burnt on the same pyre, Killed in an accident near Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.