गणपतीपुळे समुद्रात पंढरपूरचे चाैघे बुडाले, एकाचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 11:32 AM2024-06-03T11:32:39+5:302024-06-03T11:33:40+5:30

स्नानाचा माेह जिवावर

Four of Pandharpur drowned in Ganpatipule sea, one dead | गणपतीपुळे समुद्रात पंढरपूरचे चाैघे बुडाले, एकाचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश

संग्रहित छाया

गणपतीपुळे : देवदर्शनासाठी आलेले पंढरपूर येथील चाैघे अंघाेळ करताना खाेल समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी सकाळी गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली. या दुर्घटनेत अजित धनाजी वाडेकर (२५, रा. इसबावे परिचारक नगर, पंढरपूर, जि. साेलापूर) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मात्र, अन्य तिघांना वाचविण्यात यश आले.

अजय बबन शिंदे (२३), आकाश प्रकाश पाटील (२५) आणि सार्थ दत्तात्रय माने (२४, सर्व रा. इसबावे, पंढरपूर) अशी दुर्घटनेतून वाचलेल्या तिघांची नावे आहेत. अजित वाडेकर आणि त्यांचे मित्र रविवारी सकाळी १० वाजता दुचाकींवरून पंढरपूर येथून गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी आले हाेते. देवदर्शन न करता आधी समुद्रात स्नान करण्याचा निर्णय चाैघांनी घेतला. स्नान करताना खाेल पाण्यात जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी अजित वाडेकर खाेल पाण्यात अडकले.

त्यांना बाहेर येता येत नसल्याचे लक्षात येताच मित्रांनी व इतर पर्यटकांनी आरडाओरड केली. ही गाेष्ट जीवरक्षक आणि गस्तीसाठी असलेले गणपतीपुळे पाेलिस दूरक्षेत्राचे सहायक पाेलिस उपनिरीक्षक संदीप साळवी व हेडकाॅन्स्टेबल कुणाल चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जीवरक्षकांना बाेलावून समुद्राच्या पाण्यात पाठवले.

जीवरक्षक अक्षय माने, महेश देवरुखकर, अजिंक्य रामाणी, विशाल निंबरे यांच्यासह व्यावसायिक राकेश शिवलकर यांनी समुद्राच्या पाण्यात उड्या घेऊन तिघांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर पाण्यात अडकलेल्या अजित वाडेकर यांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढून देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड प्राथमिक आराेग्यकेंद्रात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. मधुरा जाधव यांनी तपासून अजित वाडेकर यांचा मृत्यू झाल्याचे घाेषित केले. उर्वरित तिघांची प्रकृती सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी जयगड पाेलिस स्थानकात नाेंद करण्यात आली आहे.

वर्षभरापूर्वीच लग्न

समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेले अजित धनावडे यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले हाेते. मित्रांसाेबत देवदर्शनाला ते आले असता काळाने त्यांना हिरावून घेतले.

स्नानाचा माेह जिवावर

पावसाळी हंगामामुळे सध्या जलपर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही चाैघे खाेल पाण्यात स्नानासाठी उतरले. त्यांचा हा माेह एकाच्या जिवावर बेतला.

खाेल पाण्यात जाऊ नका

पावसाळी हंगामामुळे समुद्राच्या पाण्याचा प्रवाह बदलत चालला आहे. त्यामुळे पर्यटक व भाविकांनी समुद्राच्या खाेल पाण्यात अंघाेळीसाठी जाऊ नये, असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायत व गणपतीपुळे-जयगड पाेलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Four of Pandharpur drowned in Ganpatipule sea, one dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.