बनावट नोटांच्या प्रकरणात रत्नागिरी जिल्ह्यातील चौघांना अटक, ७ लाखांच्या बनावट नोटा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 01:31 PM2024-07-24T13:31:10+5:302024-07-24T13:32:27+5:30

चारही संशयितांकडील मोबाइल ताब्यात घेतले

Four persons arrested in Ratnagiri district in case of fake notes, fake notes worth 7 lakhs seized | बनावट नोटांच्या प्रकरणात रत्नागिरी जिल्ह्यातील चौघांना अटक, ७ लाखांच्या बनावट नोटा जप्त

बनावट नोटांच्या प्रकरणात रत्नागिरी जिल्ह्यातील चौघांना अटक, ७ लाखांच्या बनावट नोटा जप्त

रत्नागिरी : बाजारात बनावट नोटांची हेराफेरी करणाऱ्या कार्पेंटर, चालकासह चौकडीचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने शहानवाज शिरलकर (५०), राजेंद्र खेतले (४३), संदीप निवलकर (४०) आणि ऋषीकेश निवलकर (२६) यांच्याविरुद्ध मानखुर्द पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

शिरलकर आणि खेतले हे चिपळूणमधील रहिवासी आहेत. खेतले हा व्यवसायाने चालक असून शिरलकर याचे सर्व्हिसिंग सेंटर आहे. संदीप आणि ऋषीकेश हे व्यवसायाने सुतार असून ते खेडमधील रहिवासी आहेत.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्द उड्डाणपुलाजवळ काही जण कारने बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष १० ला मिळाली. त्यानुसार पथकाने मानखुर्द उड्डाणपुलाजवळ सापळा रचला. दुपारी सव्वादोनच्या सुमारास संशयास्पद कार तेथे येऊन थांबली. पोलिस पथकाने कारला घेराव घालत कारमधील शहानवाज शिरलकर, राजेंद्र खेतले, संदीप निवलकर आणि ऋषीकेश निवलकर यांची आणि गाडीची झडती घेतली. कारमध्ये पाठीमागच्या सीटवर बसलेल्या निवलकर याच्याजवळील कापडी पिशवीमध्ये पोलिसांना भारतीय चलनातील १०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या.

गुन्हे शाखेच्या पथकाने नोटा जप्त करत चारही संशयितांना कारसह ताब्यात घेऊन मानखुर्द पोलिस ठाण्याच्या चौकीत नेले. तपासणीमध्ये १०० रुपयांच्या १ हजार ६००, २०० रुपयांच्या दोन हजार ४०० आणि ५०० रुपयांच्या ३०० अशा एकूण सात लाख १० हजार रुपये किमतीच्या एकूण चार हजार ३०० बनावट नोटा सापडल्या. अखेर, गुन्हे शाखेने सरकारतर्फे गुन्हा दाखल करून चारही संशयितांना अटक केली आहे.

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या कारसह चारही संशयितांकडील मोबाइल ताब्यात घेतले आहेत. यामागे आणखीन कुणाचा हात आहे का? याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

Web Title: Four persons arrested in Ratnagiri district in case of fake notes, fake notes worth 7 lakhs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.