चार हजार कामे कागदावर
By admin | Published: December 26, 2014 11:33 PM2014-12-26T23:33:19+5:302014-12-26T23:46:50+5:30
मग्रारोहयो : अत्यल्प मजुरीमुळे खेड्यापाड्यातील मजुरांची पाठ
रहिम दलाल -रत्नागिरी -महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी अत्यल्प मजुरी देण्यात येत असल्याने मजूर पुढे येत नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात ४३१० कामे प्रशासकीय मंजुरी मिळूनही ती मागणी न आल्याने सुरु झालेली नाहीत. त्यामुळे या योजनेचा आकडा कितीही फुगवला तरी कामे न झाल्याने तो कागदावरच राहिला आहे.
मग्रारोहयोमुळे ग्रामीण भागात रोजगार मिळणार आहे़ त्यासाठी अंगमेहनतीची कामे करणे आवश्यक आहे़ या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वर्षातून १०० दिवस काम मिळणार असल्याने हजारो कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे़
मग्रारोहयोच्या कामांसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून ६८१८ प्रस्ताव रत्नागिरी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. यामध्ये मंडणगड ५१६, दापोली ९२६, खेड ३२५, चिपळूण ७६८, गुहागर ७९५, संगमेश्वर ५९४, रत्नागिरी १२८२, लांजा ५८५ आणि राजापुरातून १०२१ प्रस्ताव आले होते. त्यापैकी ५४७० प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
मंजूर कामांपैकी ११६० कामे सुरु करण्यात आली आहेत. त्यांची कामनिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. त्यामध्ये विहिरी २०, कुक्कुटपालन गोठे २६, शौचालय ९१८, शोषखड्डे ८०, फळबाग लागवड ४१, गाळ काढणे २, रस्ते ६, नेडेप खत गांडूळ खत ५६, खड्डे व वृक्षलागवड १, वृक्षसंगोपन ११ व संरक्षक भिंत ५ या कामांचा समावेश आहे़
जिल्ह्यात ११६० कामे सुरु असली तरी अजून ४३१० कामे मजूर पुढे येत नसल्याने ती सुरु करण्यात आलेली नाहीत़ सर्वाधिक ९३१ कामे रत्नागिरी तालुक्यातील तर सर्वात कमी २0९ कामे मंडणगड तालुक्यातील आहेत.
जिल्ह्यात मग्रारोहयोमुळे लाखो स्थानिक मजुरांना काम मिळणार आहे़ मात्र, मजुरांची नांवे नोंदविली जात असून, कामे करण्यासाठी स्थानिक मजूर पुढे येत नसल्याने ४३१० कामे अजूनही सुरु झालेली नाहीत़ ही कामे सुरु न झाल्याने दरवर्षीप्रमाणे चालू आर्थिक वर्षाचा मग्रारोहयोचा आराखडाही केवळ कागदावरच राहणार आहे़
मग्रारोहयोला लोकप्रतिनिधीही आवश्यक तेवढे प्राधान्य देत नाहीत़ या योजनेचे महत्व जनतेला पटवून देऊन ती तळागाळापर्यंत नेणे आवश्यक आहे़ त्याचप्रमाणे मजुरीच्या दरात वाढ होणे आवश्यक आहे. त्यामुळे मजुरांना गावातच काम मिळेल़ तसेच शहराकडे जाणाराही लोंढा थांबेल़ त्यासाठी ग्रामीण पातळीवर प्रामाणिक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.
अनेक कामे रखडली...
तालुकासुरु न
झालेली कामे
मंडणगड२०९
दापोली६२०
खेड५४३
चिपळूण५७२
गुहागर४२५
संगमेश्वर२६१
रत्नागिरी९३१
लांजा३०१
राजापूर३९६
मंजुरी मिळाली...
मग्रारोहयोच्या माध्यमातून स्थानिक मजुरांना गावातच काम मिळणार आहे. या मजुरांना शासनाकडून प्रत्येक दिवसाला १६८ रुपये एवढी अत्यल्प मजूरी देण्यात येते. मात्र, आंबा बागायतदार व अन्य खासगी काम करताना २५० रुपयांपेक्षा जास्त मजूरी मिळत असल्याने स्थानिक मजूर कामासाठी पुढे येत नाही. त्यामुळे कामांना मंजूरी मिळूनही ती कामे सुरु झालेली नाहीत.
चालू आर्थिके वर्षामध्ये मग्रारोहयोतून सुरु असलेल्या कामांवर सुमारे २ कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. यामध्ये मागेल त्या मजुराला काम मिळेल, ही संकल्पना असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराला संधी उपलब्ध आहे.
मागील वर्षी जिल्ह्यातील ५७ जिल्हा परिषद गटामध्ये ५९ ग्रामपंचायती मग्रारोहयोमध्ये मॉडेल गावे म्हणून घेण्यात आली होती. मॉडेल गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींकडून १०४५ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ८४१ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली, तर मॉडेल गावांमध्ये २८६ कामे पूर्ण झाली असून ३९३ कामे सुरु आहेत. ग्रामीण भागातील मजुरीचे दर हे या कामातील मजुरीपेक्षा कितीतरी अधिक आहेत. त्यामुळे या कामांकडे स्थानिक मजुरांनी पाठ फिरवल्याचे दिसून येते.