चिपळुणातील चार गावे आजही कोरोनावर भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:23 AM2021-06-03T04:23:05+5:302021-06-03T04:23:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांची संख्या वाढली. मात्र, तालुक्यातील ४ गावे अद्यापही कोरोनाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांची संख्या वाढली. मात्र, तालुक्यातील ४ गावे अद्यापही कोरोनाला भारी पडली आहेत. तालुक्यातील रावळगाव, बोरगाव, खोपड आणि तळवडे गावात गेल्या सव्वावर्षाच्या कालावधीत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. या गावांतील लोकांनी कडक नियम पाळले. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी एक-दोन व्यक्तींना पाठवले. लोकांनीच स्वतःवर निर्बंध घेतल्याने या गावात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.
तालुक्यात गेल्यावर्षी खांदाटपाली येथे पहिला रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर हळूहळू कोरोनाचा जोर वाढतच गेला. गेल्या वर्षी वडेरू, आगवेसारख्या गावांत कोरोना रुग्ण सापडले नव्हते. मात्र, यावर्षी याही गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला. अद्यापही रावळगाव, बोरगाव, तळवडे आणि खोपड ही गावे कोरोनाला भारी पडली आहेत.
..............................
तळवडे तालुक्याच्या टोकास डोंगरच्या कुशीत वसलेले गाव. गावची लोकसंख्या ८३० च्या दरम्यान आहे. येथील लोक शक्यतो गावाबाहेर पडलेले नाहीत. ग्राम कृती दलानेही जनजागृती केली. ग्रामपंचायतीने केलेल्या सूचना ग्रामस्थांनी पाळल्या. येथील लोक खरेदीसाठी सावर्डे येथे जायचे. मात्र, कोरोना कालावधीत एक-दोन गाडीवालेच लोकांच्या वस्तू आणून त्यांना घरपोहोच द्यायचे. त्यामुळे लोकांचा दुसऱ्या गावातील लोकांशी संपर्क आला नाही. ग्रामपंचायतीने कोरोनाविषयक आवश्यक साहित्य ग्रामस्थांना दिले. लोक स्वतःच काटेकोर काळजी घेत असल्याने या गावात अद्याप कोरोनाची बाधा झालेली नाही.
........................
रावळगाव हे ७०० लोकवस्तीचे गाव. येथेही अद्याप कोरोनाचा शिरगाव झालेला नाही. परगावातील व्यक्ती गावात आल्यास त्यांना विलगीकरणात ठेवले जाते. नियमांचे कडक पालन होत असल्याने कोरोना या गावात शिरू शकला नाही.
.......................
खोपडची लोकसंख्या ३८६ आहे. गावातील लोक दवाखान्यासाठी परगावी जायचे. त्यासाठी गावानेच दवाखान्यासाठी खासगी डॉक्टरांना एक खोली उपलब्ध केल्याने लोक बाहेर जायचे बंद झाले. गावात येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी बंधनकारक केली. गावात येण्यासाठी एकच रस्ता असल्याने कोण येतेय, हे लगेच कळते. भाजीपाला अथवा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गावातून एक-दोन जणच बाहेर पडतात. एखाद्या ग्रामस्थांमध्ये कोरोना लक्षणे दिसली तर त्याला तत्काळ विलगीकरणात ठेवले जाते. ग्राम कृती दल नेहमीच सतर्क राहिल्याने गावात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.
.........................
बोरगाव १०५० लोकवस्तीचे गाव. येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. परजिल्ह्यातून गावात येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. एखाद्याने चाचणी केली नसल्यास त्याला १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. गावातील सर्वच लोकांना दिवसातून किमान दोनदा गरम पाण्याची वाफ घेण्याचे आवाहन केले. जे कामासाठी बाहेर पडतात. त्यांना तर विशेष काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. गावात ठरलेली लग्ने पुढे ढकलण्यात आली. लोकांनी नियमांचे काटेकोर पालन केल्याने कोरोनाचा संसर्ग झाला नाही.
सुनील हळदणकर, सरपंच, बोरगाव