Ganpati Festival-चौसोपीच्या गणेशोत्सवाला ३५८ वर्षांची परंपरा, खोदाईतून सापडली मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 03:08 PM2019-08-31T15:08:32+5:302019-08-31T15:10:31+5:30
गणपती बाप्पाच्या दृष्टांत साक्षात्कारातून खोदाईद्वारे मिळालेल्या श्री गणरायाच्या मूर्तीचा उत्सव मोरगावच्या मयुरेश्वराप्रमाणेच देवरूखमधील जोशी कुटुंबियांच्या चौसोपीमध्ये सुमारे ३५८ वर्षे अव्याहतपणे साजरा केला जात आहे. हा उत्सव प्रतिपदा ते पंचमी असा साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे.
देवरूख : गणपती बाप्पाच्या दृष्टांत साक्षात्कारातून खोदाईद्वारे मिळालेल्या श्री गणरायाच्या मूर्तीचा उत्सव मोरगावच्या मयुरेश्वराप्रमाणेच देवरूखमधील जोशी कुटुंबियांच्या चौसोपीमध्ये सुमारे ३५८ वर्षे अव्याहतपणे साजरा केला जात आहे. हा उत्सव प्रतिपदा ते पंचमी असा साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे.
जोशी कुटुंबियांची आठवी पिढी हा उत्सव साजरा करीत आहे. जोशी घराण्याचे मूळ पुरूष बाबा जोशी यांना दृष्टांत देऊन देवरूख येथे आपली प्रतिष्ठापना व पूजन कर असे खुद्द गणपती बाप्पाने सांगितले होते, अशी अख्यायिका सांगण्यात येते.
बाबा त्यानंतर घरदार सोडून संगमेश्वर तालुक्यातील देवधामापूर गावाच्या एका बाजूला असलेल्या श्री शंकराच्या मंदिरात राहू लागले. याच देवाची ते पूजाअर्चा व सेवा करू लागले. याठिकाणी त्यांनी पवित्र मनाने केलेली सेवा देवाला पावली. यावेळी तू येथे राहू नकोस, मोरगावच्या मयुरेश्वराकडे जा व तेथे सेवा कर असा पहिला दृष्टांत बाबांना झाला. या दृष्टांतानुसार बाबांनी देवधामापूर गावही सोडले. असाध्य शारीरिक त्रास होत असतानाही त्यांनी मोरगाव गाठले.
याठिकाणी त्यांनी मयुरेश्वराची उग्र तपश्चर्या केली. ही तपश्चर्या करत असताना त्यांनी केवळ कडूलिंबाचा रस प्राशन केला होता. या त्यांच्या तपश्चर्येला क ोणत्याही देवाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्यांनी तपश्चर्या व सेवा करतानाच अन्न-पाण्याचा त्याग केला. यावेळी एक आश्चर्यकारक घटना घडून काही क्षणात त्यांच्या शरिराची व्याधी पूर्णपणे निघून गेली. आपल्या तपश्चर्येला फळ मिळाल्याच्या आनंदात मयुरेश्वराला बाबांनी साष्टांग नमस्कार घातला.
यावेळी पुन्हा एकदा दुसरा दृष्टांत झाला. यात ह्यतू मंदिर परिसरात राहात असलेल्या घराच्या ओटीवर खोदाई कर व यातून जे मिळेल ते घरी घेऊन जाह्ण असे सांगण्यात आले. याप्र्रमाणे बाबांनी ओटीजवळ खोदाई केली. त्यात काहीच न मिळाल्याने ते खिन्न झाले. बाप्पांनी सांगितल्याप्रमाणे खोदाई करूनही काहीच त्यांच्या हाती न लागल्याने बाबांनी अन्नत्यागाचा निश्चय केला.
यावेळी बाप्पांचा तिसरा दृष्टांत झाला. यात तुझी खोदाईची जागा चुकली आहे, मी तुझ्या घरी पिढ्यानपिढया राहणार आहे असे सांगण्यात आले. याप्रमाणे बाबांनी योग्य जागी खोदाई केली. त्यावेळी एका चांदीच्या डब्यात चांदीची श्री सिध्दीविनायकाची उभ्या स्थितीतील उजव्या सोंडेची चार इंच उंचीची चतुर्भुज मूर्ती मिळाली.
रघुनाथ उर्फ पंतभाऊ जोशी यांच्या पश्चात आठव्या पिढीतील नातेवाईकांच्या हातात आता उत्सवाची धुरा आली आहे. त्यानुसार यावर्षीचा उत्सव ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. उत्सवासाठीची गणेशमूर्ती सात्विक भावाने देवरूख येथील भोंदे कुटुंबीय घडवतात. दिनांक ३१ रोजी भोंदे यांच्या गणेश चित्रशाळेतून सकाळी गणपतीचे सवाद्य मिरवणुकीने आगमन होणार आहे.
घराण्यांनाही मान
या गणेशमूर्तीची स्थापना रिध्दी-सिध्दी व २ पहारेदार यांच्या मूर्तींसह केली जाते. ही गणेशमूर्ती मूर्तीशाळेतून पारंपरिक पध्दतीने डोक्यावरून आणली जाते. आजही उत्सवाची परंपरा जपली जात आहे. काही घराण्यांना रिध्दी-सिध्दी यांच्या मूर्ती घेणे, गणेशाची मूर्ती डोक्यावर घेणे, पहारेदार डोक्यावर घेणे एवढेच नव्हे तर मूर्तीच्या डोक्यावर छत्री धरण्याचादेखील मान आहे.
या उत्सवात गणेशयाग, सत्यविनायक पूजा, प्रसाद, स्त्रियांसाठी हळदी-कुंकू असे कार्यक्रम भक्तांच्या अलोट गर्दीत साजरे होतात. या उत्सवाची सांगता गौरी -गणपती विसर्जनाच्या दिवशी केली जाते. यामध्ये शेवटच्या दिवशी सायंकाळी ५ ते ७.३० यावेळेत पूजा, आरती, मंत्रपुष्प, नवस करणे, नवस मानवणे व त्यानंतर श्रींचे गौरीसह विसर्जन केले जाते.