‘गंधर्वस्वरां’चा सुगंध पुन्हा दरवळणार!
By admin | Published: October 26, 2016 12:14 AM2016-10-26T00:14:52+5:302016-10-26T00:14:52+5:30
रत्नागिरीत कार्यक्रम : जयतीर्थ मेवुंडी, शौनक अभिषेकी यांची संगीत मैफल
रत्नागिरी : वेगवेगळ्या अनवट वाटांनी, आपल्या प्रतिभेचा अविष्कार सादर करून स्वत:चं एक जणू स्वयंप्रज्ञ घराणंच घडवणाऱ्या समर्थ भारतीय शास्त्रीय संगीत गायक पं. कुमार गंधर्वांच्या गायनशैलीचा सुगंध रत्नागिरीत पुन्हा एकदा दरवळणार आहे. पंडितजींची तिसरी पिढी, अर्थात त्यांचे नातू भुवनेश कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाचा आनंद रत्नागिरीकरांना दिवाळीनिमित्त घेता येणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी दिली. यापूर्वी जयतीर्थ मेवुंडी व शौनक अभिषेकी यांच्या संगीतमैफलीचा आनंद रसिकांनी घेतला आहे, अशी त्यांनी आठवण करून दिली.
समृद्ध सांगितीक वारसा लाभलेल्या घरात जन्मलेले भुवनेश हे साहजिकच सुरांच्या साथीनेच लहानाचे मोठे झाले. लहानपणी जाणीवपूर्वक ऐकण्यासाठी त्यांना वेगळा असा वेळ द्यावाच लागला नाही.
त्यांच्या लहानपणीच्या स्मृतींमध्ये पहाट, माध्यान्ह, सायंकाळ, रात्री अशा सर्व वेळी ऐकलेले विविध राग, रियाझ, ध्वनीमुद्रण यांचीच मुबलकता आहे. वसुंधरा कोमकली आणि मधुप मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. हळूहळू त्यांना जाणवत गेले की, आपले आजोबा म्हणजे संगीताचा एक ज्ञानकोषच! तो वारसा आपण प्राणपणाने जपला पाहिजे. ह्या जाणिवेला भुवनेश कोमकलीनी जोड दिली ती अखंड रियाझ आणि सतत नवीन शिकण्याच्या वृत्तीची!
गायनाची मैफल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमीतर्फे दिवाळीनिमित्त आयोजित केली आहे. ही मैफल रविवार, ३० आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता खातू नाट्यमंदिर येथे आयोजित केली आहे.
या सुसंधीचा लाभ रत्नागिरीतील रसिकांनी घ्यावा आणि दिवाळी सण संगीतमय करावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, कार्यवाह अॅड. प्राची जोशी आणि कै. यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमीचे अध्यक्ष आनंद देसाई यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
४भुवनेश कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाचा आनंद घेता येणार.
४भुवनेश हे सुरांच्या साथीनेच लहानाचे मोठे झाले.