कंपनीकडून फसवणूक
By Admin | Published: January 16, 2016 11:46 PM2016-01-16T23:46:08+5:302016-01-16T23:46:08+5:30
अजित यशवंतराव : ग्रामस्थांची फसगत झाल्याचा आरोप
राजापूर : राजापूर तालुका व परिसरातील बेरोजगार तरूणांना नोकरीची अमिषे दाखवून व शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत, वेत्ये समुद्रकिनाऱ्यालगतच्या जमिनी बळकावू पाहणाऱ्या कोलकाता येथील आयलॉग पोर्टचा बंदर प्रकल्प कंपनीकडून केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे तर शासनाचीही फसवणूक होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी केला आहे.
या परिसरातील गोरगरीब शेतकऱ्यांची व शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावात वस्तुस्थितीबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्या आयलॉग पोर्ट बंदर प्रकल्प कंपनी विरोधात आता कायदेशीर कारवाईच्या मार्गाचा अवलंब करणार असल्याचेही अजित यशवंतराव यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे प्रसिध्दीपत्रकही त्यांनी दिले आहे.
राजापूर तालुक्यात यापूर्वी राजापूर शिपयार्ड या कंपनीकडून वाडा, वेत्ये परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली आहे. या शेतकऱ्यांनी सध्या या कंपनीविरोधात लढा पुकारला आहे. ही फसवणूक ताजी असतानाच आता कोलकातातील आयलॉग पोर्ट बंदर प्रकल्प कंपनीकडूनही अशाप्रकारे नाटे आंबोळगड किनाऱ्यावर वेत्ये परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची बाब पुढे आली आहे. या विरोधात आता या परिसरातील शेतकऱ्यांनीही संघटीतपणे लढा देण्याचा निर्धार केला आहे. याला राष्ट्रवादीचे प्रदेश युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
जर अशाप्रकारे कोणतीही कंपनी तालुक्यात येऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणार असेल तर आम्ही ते कदापीही सहन करणार नाही, असे स्पष्ट करत ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, असे यशवंतराव यांनी स्पष्ट केले आहे.
या कंपनीकडून शेतकऱ्यांचीच नव्हे तर शासनाची देखील फसवणूक करण्यात आल्याचे यशवंतराव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
खोटी माहिती? : कंपनीचा अहवाल चुकीचा?
या प्रकल्पस्थळापासून जवळपास २.५० कि. मी. क्षेत्रामध्ये मनुष्यवस्ती आणि घरे नाहीत असे अहवालात नमुद करण्यात आले असले तरी प्रकल्पक्षेत्राच्या जवळच १ ते १.५० कि. मी. परिसरात आंबोळगड हे गाव वसलेले आहे. दोन कि. मी. अंतरावर तिवरे तर पुढे वेत्ये ही गावे आहेत. शासनाकडून व पर्यावरण मंडळाकडून परवाना मिळवण्यासाठी कंपनीकडून खोटी माहिती देण्यात आली आहे. तसेच जैविक पर्यावरण अहवालामध्ये तर अभ्यास क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरात जंगले नाहीत असे नमुद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र या परिसरात नाटे, पडवणे व वेत्ये गावातील अनेक शेतकऱ्यांच्या कलमाच्या बागा असल्याचे यशवंतराव यांनी सांगितले.
गुन्हा दाखल करा
कंपनी चुकीचा अहवाल तयार करून फसवणूक करत आहे. कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यशवंतराव यांनी सांगितले.