स्किममधील गुंतवणुकीत फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:36 AM2021-08-20T04:36:00+5:302021-08-20T04:36:00+5:30
रत्नागिरी : क्रिस्टल जंबो व क्राऊन ग्लोबल या स्किममध्ये गुंतवलेली सुमारे ३ लाख रूपयांची रक्कम मुदत संपल्यानंतरही परत न ...
रत्नागिरी : क्रिस्टल जंबो व क्राऊन ग्लोबल या स्किममध्ये गुंतवलेली सुमारे ३ लाख रूपयांची रक्कम मुदत संपल्यानंतरही परत न केल्याने रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० डिसेंबर २०१३ ते १८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी दिनकर शंकर शितूूत (६७, रा. मुरलीधर मंदिर बंदररोड, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेखर कोतवडेकर (रा. शंखेश्वररत्न, रहाटघर, रत्नागिरी), प्रवीण महाडिक (रा. संगमेश्वर) आणि सिट्रस्ट चेक इन्स, लिमिटेड शाखा देवरूखचे संचालक यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनकर शितूत यांनी शेखर कोतवडेकर यांच्यामार्फत क्रिस्टल जंबो या स्किममध्ये २ लाख रूपये आणि क्राऊन ग्लोबल या स्किममध्ये १ लाख रूपये असे एकूण ३ लाख रूपये गुंतवलेले होते. स्किममध्ये गुंतवल्याची मुदत २० डिसेंबर २०१९ रोजीपर्यंत होती. मुदत पूर्ण होऊन १७ महिने झाले तरी सिट्रस्ट चेक इन्स, लिमिटेड कंपनीकडून कुठल्याही प्रकाराची रक्कम न मिळाल्याने शितूत यांनी संशयितांना फोन केले. परंतु, त्यांना रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येऊ लागली. तसेच वारंवार उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी याबाबत शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करीत आहेत.