कोकणच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:32 AM2021-04-04T04:32:39+5:302021-04-04T04:32:39+5:30
कोकणातून आंबा वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. सध्या १७ ते १८ हजार पेट्या दरदिवशी विक्रीसाठी येत आहेत. दोन ...
कोकणातून आंबा वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. सध्या १७ ते १८ हजार पेट्या दरदिवशी विक्रीसाठी येत आहेत. दोन ते साडेचार हजार रुपये दराने आंबा पेटीला दर प्राप्त होत आहेत. अन्य राज्यांतूनही आंबा आवक एकाच वेळी सुरू झाली असून कर्नाटकचा हापूस दाखल झाला आहे. मुंबईतील विक्रेत्यांकडून कोकणच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री करण्यात येत असून, ग्राहकांची चक्क फसवणूक केली जात आहे.
वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणाबरोबर कर्नाटक राज्यातून आंबा विक्रीला येत आहे. कोकणाबरोबर कर्नाटकचा आंबाही तुलनेने तितकाच आहे. कोकणच्या हापूसप्रमाणे कर्नाटकचा हापूस दिसायला सारखा आहे. मात्र चव, दर्जा व सालीमध्ये फरक आहे. कोकणातून हापूस कलमे नेऊन कर्नाटकमध्ये लागवड करण्यात आली असली तरी माती, पाणी तसेच हवामानामुळे फळांमधील वैशिष्टही भिन्न आहेत. मात्र, हे सहजासहजी ग्राहकांना ओळखता येत नाही.
कोकणातील हापूसची विक्री ५०० ते ८५० रुपये डझन दराने विक्री सुरू आहे. मात्र, कर्नाटकचा हापूस ७० ते १२० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. विक्रेते दोन्ही प्रकारचा आंबा विकत घेतात. तुलनेने कर्नाटकचा आंबा जास्त घेतात. दोन्ही प्रकारचे आंबे एकाच वेळी पिकायला ठेवतात. आंबे पिकल्यानंतर ते पेटीत एकत्रित करून भरले जातात. कोकणचा हापूस सांगून कर्नाटक हापूसची विक्री करून विक्रेते पैसे मिळवीत आहेत. यामुळे शेतकरी उपाशी; परंतु विक्रेते मालामाल होत आहेत. कोकणच्या हापूसला भौगोलिक निर्देशांक प्राप्त झाला असून, कोकणच्या नावाखाली अन्य राज्यातील हापूसची विक्री करून ग्राहकांची फसवणूक सुरू असून याबाबत हापूस उत्पादक संघाने आवाज उठविण्याचा इशारा दिला आहे.