कोरोना आपत्तीसाठी ह्युमॅनिटी ग्रुपची रुग्णवाहिकेची मोफत सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:33 AM2021-05-07T04:33:17+5:302021-05-07T04:33:17+5:30

रत्नागिरी : तपासणी केंद्रावर कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांना तातडीने शासकीय अथवा खासगी रुग्णालयात, तसेच केअर सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी ...

Free Humanitarian Group Ambulance Service for Corona Disaster | कोरोना आपत्तीसाठी ह्युमॅनिटी ग्रुपची रुग्णवाहिकेची मोफत सेवा

कोरोना आपत्तीसाठी ह्युमॅनिटी ग्रुपची रुग्णवाहिकेची मोफत सेवा

Next

रत्नागिरी : तपासणी केंद्रावर कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांना तातडीने शासकीय अथवा खासगी रुग्णालयात, तसेच केअर सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी येथील ह्युमॅनिटी ग्रुप मानवतेच्या भावनेने पुढे सरसावला असून, या सामाजिक संस्थेने यासाठी स्वत:च्या खर्चातून रुग्णवाहिका खरेदी करून मोफत सेवा देण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते बुधवारी या सेवेचा प्रारंभ शासकीय विश्रामगृह येथे झाला. या रुग्णवाहिकेला ऑक्सिजन सिलिंडर सुविधा देण्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी जाहीर केले आहे.

शहरातील रा. भा. शिर्के प्रशालेत सध्या कोरोनाची चाचणी करण्यासाठी तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी ॲँटिजेन चाचणी बाधित अहवाल आलेल्या रुग्णांना शासकीय अथवा खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणतीच वाहन सुविधा नसल्याने हे रुग्ण बरेचदा आपल्या घरच्यांच्या दुचाकी किंवा चारचाकीमधून, तर कधी रिक्षातून दाखल होतात. त्यामुळे संसर्ग अधिक वाढण्याचा धोका येथील ह्युमॅनिटी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आला. यावर काहीतरी करायला हवे या विचारांतून या संस्थेने रुग्णवाहिकेची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात आणलाही. पवित्र रमजान महिना सुरू असताना या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी स्वत: निधीची उभारणी करून रुग्णवाहिका खरेदी केली.

बुधवारी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेच्या कार्याचा प्रारंभ झाला. यावेळी ह्युमॅनिटी ग्रुपचे शकील मुर्तुझा, शिरगावचे उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी, नगरसेवक सुहेल मुकादम, मुसा काझी, मजगावचे सरपंच फैयाज मुकादम, शकील मोडक, साहिल पठाण, सिकंदर खान, रिजवान मुजावर, आदी पदाधिकारी, तसेच ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी उपस्थित होते.

हेल्पिंग हँडसचे सदस्य आणि राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांच्याकडे या रुग्णवाहिकेचे अधिकार देण्यात आले आहेत. ही रुग्णवाहिका रा. भा. शिर्के प्रशालेच्या पटांगणावर तैनात राहणार आहे. त्यामुळे येथील तपासणी केंद्रावर आलेल्या बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी या रुग्णवाहिकेची मोफत सेवा मिळणार आहे. याआधीही ह्युमॅनिटी ग्रुपने महिला रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, तसेच लसीकरण केंद्रांना मोफत पाण्याच्या बाटल्यांचा उपक्रम सुरू ठेवला आहे. यापुढेही अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस ह्युमॅनिटी ग्रुपचे शकील मुर्तुझा यांनी व्यक्त केला आहे.

कोविड सेंटर उभारणार

जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यादृष्टीने रत्नागिरीतील सर्व ग्रुप यांच्या सहकार्याने शहरात २५ ते ५० खाटांचे ऑक्सिजन बेड असलेले कोविड सेंटर उभारण्याची तयारी या ग्रुपकडून सुरू आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. चिपळूण गोवळकोट येथील मदरशात सध्या असे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. ते पाहण्यासाठी या ग्रुपचे काही पदाधिकारी जाणार असल्याची माहितीही शकील मुर्तुझा यांनी दिली.

या बातमीला ६ रोजीच्या शोभना फोल्डरला ॲम्ब्युलन्स नावाने फोटो आहेत.

Web Title: Free Humanitarian Group Ambulance Service for Corona Disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.