कोरोनाशी लढणाऱ्या व्यक्ती आणि रुग्णांच्या नातेवाइकांना दर दिवशी मोफत नाष्टा आणि भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:40+5:302021-05-29T04:24:40+5:30
रत्नागिरी : संकटाच्या वेळी धावून जाणे, ही आता रत्नागिरीकरांची ओळख झाली आहे. मग ते संकट पावसाचे, वादळाचे किंवा अगदी ...
रत्नागिरी : संकटाच्या वेळी धावून जाणे, ही आता रत्नागिरीकरांची ओळख झाली आहे. मग ते संकट पावसाचे, वादळाचे किंवा अगदी गेल्या दीड वर्षांपासून अवघ्या जगाला ग्रासणाऱ्या कोरोनाचे असो. अशा सर्व संकटावेळी धावून येतात ते रत्नागिरीतील सर्व सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते. रत्नागिरीतील आस्था फाऊंडेशन हा असाच कार्यकर्त्यांची टीम सध्या कोरोना लढ्यात काम करणाऱ्या व्यक्ती आणि कोरोनाग्रस्त नातेवाईकांसाठी मोफत नाष्टाच नव्हे तर जेवण पुरविण्याचे महान कार्य करत आहेत.
कोविडकाळात कोणीही अडचणीत असलेली व्यक्ती उपाशी राहू नये, या नि:स्वार्थी भावनेने आस्था फाऊंडेशनची सुमारे ४० जणांची टीम सुमारे महिनाभर कोविडचे शासकीय सुरक्षा नियम पाळून ‘अविरत मोफत भोजन वाटप सेवा’ ही संकल्पना राबवत आहे. आतापर्यंत हजारो गरजूंना या सेवेचा लाभ मिळाला आहे. पन्नास खिचडीपासून सुरू झालेल्या या उपक्रमातून आता दरदिवशीच अगदी ३०० जणांचा नाष्टा आणि जेवण मोफत पुरविले जात आहे. तेही जिल्हा शासकीय रुग्णालय आणि महिला रुग्णालयात जावून. तौक्ते चक्रीवादळासारख्या भयावह काळातसुद्धा आस्था फाऊंडेशनचे कार्यकर्ते आपल्या सेवेत मग्न होते.
रत्नागिरीतील अनेक सामाजिक संस्था ‘हेल्पिंग हँड’ या फोरमखाली एकत्र येऊन कोरोनाग्रस्तांना दिलासा देतानाच त्यांच्या नातेवाईकांच्या सहकार्याला धावून जात आहेत. एवढेच नव्हे तर कोविड रुग्णालये, केअर सेंटर यात काम करणारे परजिल्हातील डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य आरोग्य कर्मचारी यांचीही गैरसोय लक्षात घेत त्यांना या विनामूल्य सेवेचा लाभ देत कृतकृत्य होत आहेत.
या टीममध्ये रत्नागिरीतील विशेष कारागृहाचे तुरुंग अधिकारी अमेय पोतदार, मिलिंद मिरकर, सुयोग सावंत, स्वप्निल गावखडकर, सागर कोळी, लँसी सेराव, मैत्री फेडरेशन नारीशक्ती बचत गटाच्या संपदा रसाळ, जागुष्टे आदी सुमारे ४० कार्यकर्त्यांचा समावेश आहे. स्वखर्चातून आतापर्यंत त्यांची ही सेवा सुरू होती. त्यांचे हे कार्य पाहून आता अनेक मदतीचे हात त्यांच्या सहकार्यासाठी पुढे येत आहेत.
ज्यांना या समाजकार्यात सहभागी होऊन वस्तुरूप किंवा आर्थिक हातभार उचलायचा असेल त्यांनी आस्था फाऊंडेशनचे सुयोग सावंत, मिलिंद मिरकर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुद्धपाैर्णिमा, संकष्टीला विशेष भोजन
आस्था फाऊंडेशन दर दिवशी २५० ते ३०० जणांना मोफत नाष्टा आणि भोजन देत आहे. दर दिवसाचा खर्च २० हजार रुपयांच्या आसपास आहे. मात्र, खर्चाचा विचार न करता या टीमने बुद्ध पाैर्णिमेच्या दिवशी रत्नागिरीतील दोन्ही कोविड रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक आणि कोरोनाकाळात काम करणारे बाहेरून आलेले डाॅक्टर तसेच अन्य स्टाफ यांना सणासुदीला मिळते तसे गुलाबजामसह अन्य जेवण दिले. शनिवारी संकष्टी चतुर्थी असल्याने उपवासाचा दिवस लक्षात घेऊन आस्था फाऊंडेशनतर्फे मोदक, वरणभात आदींचा समावेश असलेले पूर्ण जेवण दिले जाणार आहे. जेवणाबराेबरच नाष्ट्यातही मिसळपाव, उप्पीट अशी विविधता जपली जात आहे.