चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 02:38 PM2019-07-19T14:38:47+5:302019-07-19T14:43:59+5:30
समुद्रकिनारपट्टीवरील जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या चक्रीवादळाची आगाऊ कल्पना मिळावी, यासाठी चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठीच्या प्रकल्प अहवालास जागतिक बँकेने मान्यता दिली आहे. त्यामुळे ही केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य प्रकल्प सुकाणू समितीच्या बैठकीतही या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे.
विहार तेंडुलकर
रत्नागिरी : समुद्रकिनारपट्टीवरील जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या चक्रीवादळाची आगाऊ कल्पना मिळावी, यासाठी चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठीच्या प्रकल्प अहवालास जागतिक बँकेने मान्यता दिली आहे. त्यामुळे ही केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य प्रकल्प सुकाणू समितीच्या बैठकीतही या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे.
समुद्रकिनारी चक्रीवादळाचा असलेला धोका ध्यानी घेऊन कोकण विभागातील चार जिल्ह्यात चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ४२ कोटी ३९ लाख ४७ हजार ८१८ रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील ११ ठिकाणी ही बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार आहेत. हे काम पुढील १८ महिन्यात म्हणजेच २०२० पर्यंत पूर्ण करावयाचे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार असून, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पासाठी राज्य प्रकल्प सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत कामांना मान्यता देण्यात आली आहे.
चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून प्रकल्प अहवाल मागवण्यात आला होता. तो प्राप्त झाल्यानंतर आता ही केंद्र उभारण्याच्या कामांना तसेच प्रशासकीय खर्चाला मंजुरी मिळाली आहे.
या अकरा ठिकाणी उभारली जाणार केंद्र
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यातील काळेथर, आचरा, जामसंडे, विजयदुर्ग, सैतवडे, हर्णै, एडवण, दिघी, दाभोळ, बोर्ली, उसरणी अशा अकरा ठिकाणी ही केंद्र उभारली जाणार आहेत.