रत्नागिरी आरटीओ कार्यालयात मोफत वाय फाय, ऑनलाइन सेवा जलद गतीने मिळणार
By शोभना कांबळे | Published: May 4, 2023 05:17 PM2023-05-04T17:17:23+5:302023-05-04T17:32:25+5:30
मोबाइल नेटवर्कच्या अडचणीमुळे कार्यालयात येणाऱ्या जनतेची गैरसाेय होत होती
रत्नागिरी : ऑनलाइन सुविधा देताना नागरिकांना येणाऱ्या नेटवर्कची समस्या लक्षात घेऊन येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोफत वाय फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनापासून ही सुविधा सुरू करण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांची कामेही जलद गतीने होत आहेत.
राज्याचा परिवहन विभागही आता ‘हायटेक’ झाला आहे. या विभागाच्या सुमारे ५८ सेवा ‘सारथी’ प्रणालीवर ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा याची बचत होत असून, कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे आता वाचले आहेत. नागरिकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येत आहे. त्यामुळे या विभागाचे कामही गतिमान झाले आहे.
मात्र, मोबाइल नेटवर्कच्या अडचणीमुळे कार्यालयात येणाऱ्या जनतेची अतिशय गैरसाेय होत होती. ही गैरसोय दूर करण्याच्या हेतूने येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी कार्यालयात १ मे पासून मोफत वाय फाय सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांना या सुविधेमुळे ऑनलाइन सेवा जलद गतीने मिळणार आहेत.
आरटीओ कार्यालयाच्या बहुतांश सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. मात्र नेटवर्कच्या समस्येमुळे या सेवा देताना अनेक अडचणी येत होत्या. तसेच नागरिकांचीही गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र दिनी कार्यालयात मोफत वाय फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. - जयंत चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी