अंत्यसंस्काराला आलेल्या सर्वांची विलगीकरणातून सुटका?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:23 AM2021-06-06T04:23:44+5:302021-06-06T04:23:44+5:30
राजापूर : कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून त्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्या व त्यावेळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची मागणी राजापूरवासीयांमधून ...
राजापूर : कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून त्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्या व त्यावेळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची मागणी राजापूरवासीयांमधून हाेत आहे. मात्र, या घटनेला २४ तासांहून अधिक काळ उलटला तरी अद्यापही या व्यक्तींना क्वारंटाईन न केल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राजापूर शहरातील कोंढेतड येथील एका व्यक्तीचा लांजा येथे कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी राजापूर नगर परिषदेला मृतदेह ताब्यात देण्यासाठी पत्र दिल्याने तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा मृतदेह पिशवीतून बाहेर काढून त्यावर धार्मिकरितीने अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजापूर शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी राजापूर नगर परिषद प्रशासनाने फिर्याद दिल्यानंतर सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अंत्यसंस्काराला उपस्थित असणाऱ्या ‘त्या’ व्यक्तींवर कारवाई करण्याबरोबरच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना लगेचच क्वांरटाईन करण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती तसेच क्षेत्र प्रतिबंधित करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली होती. मात्र, जनतेच्या या मागणीकडे प्रशासनाने अद्यापही कानाडोळा केला असून, जनतेवर साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई करणाऱ्या व आता जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.