व्हॉटस्अॅपमुळे चाळीस वर्षांनी भेटले मित्र
By admin | Published: March 19, 2015 09:28 PM2015-03-19T21:28:25+5:302015-03-19T23:54:28+5:30
व्हॉटस्अपच्या माध्यमातून सगळे एकत्र आले आणि खऱ्या अर्थाने स्नेहसंमेलन साजरे झाले. नुसतंच संमेलन झालं नाही तर त्यांनी तब्बल दोन लाख रूपयांची देणगीही आपल्या शाळेला
रत्नागिरी : सगळेचजण वयाची ५५ वर्षे ओलांडलेले. आता त्यांची नातवंड शाळकरी वयाची. सगळ्यांमधला समन्वयाचा धागा एकच... फाटक प्रशालेच्या १९७३-७४ या वर्षातील अकरावी ‘अ’ची बॅच... नोकरी-व्यवसाय, कुटुंबासाठी म्हणून इतरत्र विखुरलेले... तब्बल ४० वर्ष लोटली होती. पण व्हॉटस्अपच्या माध्यमातून सगळे एकत्र आले आणि खऱ्या अर्थाने स्नेहसंमेलन साजरे झाले. नुसतंच संमेलन झालं नाही तर त्यांनी तब्बल दोन लाख रूपयांची देणगीही आपल्या शाळेला दिली.डॉ. राज शेरे यांनी व्हॉटस्अपव्दारे गु्रप तयार केला. संतोष देसाई व अंजली गोरे यांच्या मदतीने बहुतांश वर्गमित्रांचा एक ग्रुप तयार झाला. संबंधितांनी यथाशक्ती रक्कम गोळा केली. त्यातून दोन लाख रूपये जमा झाले. पैकी एक लाखाची देणगी वर्गमित्र व सध्याचे न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. वसंत जोशी यांच्याकडे सुपुर्द केली गेली.
शनिवारी सर्व मंडळी नियोजनाप्रमाणे मारूती मंदिर येथे एकत्र आली. तेथून गणपतीपुळेपर्यंत छोटी सहल काढण्यात आली. संध्याकाळी ७ वाजता सर्व मंडळी हातखंबा येथे पुन्हा एकत्र जमली. मृत मित्रांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर स्नेहसंमेलनासह स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. रत्नागिरीत फाटक प्रशालेत शिक्षण घेताना आलेले अनुभव, मिळालेली ज्ञानाची शिदोरी, पुढील वाटचाल यासारख्या गोष्टींना उजाळा देण्यात आला.
रविवारी सकाळी सर्व मंडळी फाटक प्रशालेत एकत्र जमली. अकरावी ‘अ’च्या वर्गात बसून आठवणींना उजाळा दिला. डॉ. एम. एम जोशी व बाळ सर यांचा चांदीचे नाणे, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. वसंत जोशी यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. पावसपर्यंत छोटी सहल काढून निरोप समारंभ हातखंबा येथे पार पडला. सर्व वर्ग मित्रांना स्मृतीचिन्हे व भेटवस्तू देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संतोष देसाई, राज शेरे, जयंत भिडे, केशव भट, अंजली गोरे, प्रकाश लेले, गणेश नानिवडेकर, डॉ. वसंत जोशी यांनी केले होते. त्यांना त्याच्या वर्गमित्र सहकाऱ्यांनी मोलाची साथ दिली. (प्रतिनिधी)