बिबट्यांचा मानवी वस्तीकडे मोर्चा

By admin | Published: May 14, 2016 11:52 PM2016-05-14T23:52:35+5:302016-05-14T23:52:35+5:30

खेड तालुका : जंगलात ४ बिबटे असल्याचा दावा

Front of the human habitation of leopards | बिबट्यांचा मानवी वस्तीकडे मोर्चा

बिबट्यांचा मानवी वस्तीकडे मोर्चा

Next

श्रीकांत चाळके ल्ल खेड
खेड तालुक्यात सातत्याने होत असलेली वृक्षतोड आणि डोंगराळ जमिनीचे सपाटीकरण करण्याच्या कामाला मिळालेली गती तसेच वन्यप्राण्यांच्या शिकारीमुळे बिबट्याला जंगलमय भागात भक्ष्य मिळणे दुरापास्त झाले आहे़ यामुळे शिकारीला बाहेर पडलेला बिबट्या अगदी मानवी वस्तीतील घरापर्यंत पोहोचण्याचे प्रमाण वाढले असून, सन २०१२ ते २०१५ या तीन वर्षात बिबट्याने ५८ शेतकऱ्यांची ९१ जनावरे फस्त केली आहेत. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी ३ लाख ९१ हजार रूपयांची मदत वन विभागाकडून देण्यात आली आहे़
भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीपर्यंत येण्याचे बिबट्यांचे प्रमाण सध्या वाढले असून, सद्यस्थितीत खेड तालुक्यातील घनदाट जंगलात ४ ते ५ बिबटे असल्याचा दावा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. खेड तालुक्याचा भौगोलिक विस्तार तसा मोठा आहे. डोंगराळ व दुर्गम भागामुळे तालुक्यातील बहुताशी भाग हा जंगलमयच आहे. जिल्हाभरात जसा जास्त पर्जन्यमानात संगमेश्वर तालुक्याचा प्रथम क्रम लागतो, तसा खेड तालुक्याचा जंगलमय भागाने निम्मा अधिक भाग व्यापला आहे. यामुळे भातशेतीपेक्षा वनराईने व्यापलेल्या खेड तालुक्यामध्ये बिबट्याची संख्यादेखील वाढलेली आहे. खेड तालुक्यातील सन २००१मधील बिबट्यांची संख्या एक अथवा दोन असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. हीच संख्या सन २०१४-१५मध्ये ४ ते ५ असावी, असा अंदाजदेखील वन विभागाने व्यक्त केला आहे.
२००१ पासून २०१५ दरम्यान बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. विशेषत: वडगाव, कांदोशी, कोतवली, शिरगाव, रसाळगड परिसर तसेच रघुवीर घाट, आदी ठिकाणच्या जंगलात हे बिबट्या संचार करत असल्याचे आढळून आले आहे़ एका रात्रीत बिबट्या भक्ष्याच्या शोधात १२ किलोमीटर अंतर फिरतो तर १ जनावर फस्त केल्यावर तो महिनाभर शांत बसतो. त्यानंतर पुन्हा हाच बिबट्या शिकारीला बाहेर पडत असल्याचे येथील वन अधिकारी एस. जी. सुतार यांनी सांगितले.
सद्यस्थितीत तेथील वनराईची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने भक्ष्याच्या शोधार्थ संचार करत असलेले हे बिबटे अगदी मानवी वस्तीपर्यंत येऊ लागले आहेत. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड व रात्रीच्या सुमारास अनेकवेळा हौसेखातर होत असलेली वन्यप्राण्यांची शिकार यामुळे भक्ष्य शोधताना बिबट्यांना अडचणी येत आहेत. भरणे, खोंडे परिसर तसेच कर्टेल, कोतवली, आंबवली, शिरगाव, कर्जी आमशेत, अजगणी, मांडवे, घेरासुमारगड, तुळशी, वाडी जैतापूर आणि शिवतर परिसरात हेच बिबटे रात्रीच्या सुमारास अनेकदा आढळून आले आहेत, असे सुतार यांनी सांगितले.
सन २०१२-१३ या वर्षामध्ये खेड तालुक्यातील २३ शेतकऱ्यांची ४० जनावरे या बिबट्याने मारली आहेत. त्यांना नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारच्या वन विभागाकडून १ लाख १९ हजार ९०० रूपयांची मदत देण्यात आली आहे तर सन २०१३-१४ या वर्षामध्ये २२ शेतकऱ्यांची ३१ जनावरे बिबट्याने फस्त केली असून, त्यांच्या नुकसान भरपाईपोटी १ लाख ६२ हजार २५० रूपये आणि सन २०१४-१५ या वर्षामध्ये १३ शेतकऱ्यांची २० जनावरे या बिबट्यांनी मारली असून, त्यांना नुकसानभरपाईपोटी वन विभागाने १ लाख ८ हजार ८७५ रूपये मदत देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यामध्ये चिपळूण येथील वन विभागाचे विभागीय वन अधिकारी ए. एन. साबळे, दापोली येथील परिक्षेत्र वन अधिकारी आर. जे. पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे वनपाल एस. जी. सुतार, वनरक्षक मारूती जांभळे, यशवंत सावर्डेकर, रामदास खोत, अनिल दळवी, धोत्रे आणि चौगुले, निमकर, आदी अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
सध्या बिबट्यांचा खेड तालुक्यातील मानवी वस्त्यांतील वावर वाढू लागला आहे. मात्र, या बिबट्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी खेड तालुका वन विभागाने केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे.
वन विभाग : बिबटे पकडण्यात अपयश
गेल्या ४ ते ५ वर्षांमध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना तसेच शिकारीसाठी गावामध्ये आलेल्या ३ बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाने केलेले प्रयत्न आत्तापर्यंत वाया गेले आहेत. खेड तालुक्यात सध्या ४ ते ५ बिबटे असल्याचे खेड वन विभाग कार्यालयाकडून सांगण्यात आले.
केवळ एक पिंजरा
सध्या वन विभागाकडे केवळ १ पिंजरा आहे. मात्र, कर्मचारी संख्या अपुरी असल्याने या पिंजऱ्याचा योग्य विनीयोग करता येत नाही.

Web Title: Front of the human habitation of leopards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.