फळांची आवक वाढली, दरामध्ये चढ-उतार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:28 AM2021-04-12T04:28:39+5:302021-04-12T04:28:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : उष्मा वाढला असल्याने फळांना सध्या वाढती मागणी आहे. फळांचा राजा आंबा बाजारात दाखल झाला ...

Fruit inflows increased, prices continued to fluctuate | फळांची आवक वाढली, दरामध्ये चढ-उतार सुरू

फळांची आवक वाढली, दरामध्ये चढ-उतार सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : उष्मा वाढला असल्याने फळांना सध्या वाढती मागणी आहे. फळांचा राजा आंबा बाजारात दाखल झाला असला तरी, दर मात्र सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. कलिंगड, पपई, टरबूज, केळी, संत्री, मोसंबी यांसारख्या फळांना विशेष मागणी होत आहे.

कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी ‘क’ जीवनसत्त्व असलेल्या फळांचा खप वाढला आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने नारळपाणी, कलिंगडे, टरबुजाला मागणी होत आहे. याशिवाय किवी, पपई, ड्रॅगन फ्रूटसारख्या फळांची खरेदीही प्राधान्याने केली जात आहे. फळांना मागणी वाढली असली तरी, दरातही वाढ झाली आहे. ‘क’ जीवनसत्त्वाची भरपूर मात्रा असलेल्या लिंबूचा खप चांगला होत असून लिंबूचे दर मात्र कडाडले आहेत. सर्व प्रकारची फळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत

आल्याचे दर स्थिर असून २५ ते ३० रुपये पाव किलो दराने आले विक्री सुरू आहे. कोरोनामुळे चहामध्ये आले टाकून किंवा काढा तयार करून प्राधान्याने सेवन केले जाते. मात्र उष्मा वाढल्याने आल्याचा वापर सुरू असला तरी, प्रमाण मात्र कमी झाले आहे. स्थानिक तसेच परजिल्ह्यातील आले बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

फळांचा राजा बाजारात दाखल झाला असला तरी प्रमाण अल्प आहे. ५५० ते १२०० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. कच्चा व पिकलेला दोन्ही प्रकारचा आंबा विक्रीसाठी येत आहे.

उकाड्यामुळे कलिंगडांना वाढती मागणी आहे. कलिंगडाच्या दरात वाढ झाली आहे. २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. अननस बाजारात मुबलक स्वरूपात विक्रीसाठी येत असून ३५ ते ५५ रुपये नग दराने विक्री करण्यात येत आहे.

पालेभाज्यांसह फळभाज्यांना वाढती मागणी असली तरी, दर मात्र कडाडलेले आहेत. भाजी जुडी १५ रुपये, तर बहुतांश भाज्या १५ ते २० रुपये पाव किलो दराने विकण्यात येत असल्याने परवडत नाहीत.

- दीपिका शेलार, गृहिणी

कांद्याच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहे. कांदा १८ ते २२, तर बटाटा २० ते २५ रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कांद्याला वाढती मागणी असून दर अजून कमी होणे अपेक्षित आहे.

- रचना कापसे, गृहिणी

Web Title: Fruit inflows increased, prices continued to fluctuate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.