एकीचे बळ मिळते फळ, तब्बल ३५० शेतकऱ्यांनी एकत्रित येत फुलविला मळा; करतायत विविध प्रकारची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 06:07 PM2021-12-30T18:07:40+5:302021-12-30T18:08:10+5:30
रासायनिकऐवजी सेंद्रिय शेतीवर या गटाचा विशेष भर आहे. ‘एकीचे बळ मिळते फळ’ याप्रमाणे श्रीमंत बळीराम सेंद्रिय गट सामूहिक परिश्रमातून यशस्वी वाटचाल करीत आहे.
महेरुन नाकाडे
रत्नागिरी : एका व्यक्तीने शक्य नाही, परंतु ३५० शेतकऱ्यांनी एकत्रित येत नऊ एकर क्षेत्रावर मळा फुलविला आहे. कोकणच्या लाल मातीत स्ट्राॅबेरी, रंगीत कलिंगडे, कांदा, बटाटा, लसूण, सिमला मिरची, टोमॅटोसहित अन्य पालेभाज्या, फळभाज्यांचे भरघोस उत्पन्न घेता येते, हे धामणी (संगमेश्वर) येथील श्रीमंत बळीराजा सेंद्रिय शेतकरी गटाने सिद्ध केले आहे. दुबई, साैदी अरेबिया येथे कलिंगड निर्यात करणारा जिल्ह्यातील पहिला गट ठरला आहे.
खरीप हंगामात भात, नागली उत्पन्नानंतर मोजकेचे शेतकरी कुळीथ व भाज्यांचे उत्पन्न घेतात, उर्वरित क्षेत्र मोकळेच असते. त्यामुळे धामणीतील २१ शेतकऱ्यांनी एकत्रित येत रब्बी हंगामात शेती करण्याचे निश्चित केले. सुरुवातीला कुळीथ, पालेभाज्यांचे उत्पन्न घेतले. हळूहळू जम बसल्यानंतर गावातील अन्य शेतकरीही त्यांच्यासमवेत जोडले गेले. सध्या ३५० शेतकरी एकत्रित येऊन नऊ एकर क्षेत्रावर विविध प्रकारची शेती करीत आहेत. भुईमूग, मका, आले, वांगी, पावटा, भेंडी, कोथिंबीर, झेंडू, गवार, दुधी भोपळा, पडवळ, काकडी, दोडका आदी विविध प्रकारचे उत्पन्न घेत आहेत. आंबा, काजू बागायतीही आहे.
कलिंगड उत्पादनावर त्यांचा विशेष भर आहे. दोन वर्षांपूर्वी ३० टन कलिंगड त्यांनी दुबई, साैदी अरेबिया येथे निर्यात केले होते. दोन वर्षे कोरोनाचा फटका बसला; मात्र कलिंगड महोत्सव आयोजित केला होता, त्याला चांगला प्रतिसाद लाभला. गतवर्षी स्ट्राॅबेरी लागवडीचा प्रयोग त्यांनी केला आणि लाल मातीत चांगल्या दर्जाची स्ट्राॅबेरी घेता येते, हे सिद्ध केले. यावर्षी या गटाने पावसामुळे स्ट्राॅबेरी लागवड टाळली असून कांदा, लसूण, बटाटा लागवड केली आहे. ते शेतीसाठी आधुनिक तंत्राचा वापर करत आहेत.
नऊ प्रकारची कलिंगडे
गटातर्फे नऊ प्रकारची कलिंगडे लागवड करीत आहेत. रंगीत कलिंगड उत्पादन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. २० ते २२ किलो वजनाचे कलिंगड उत्पादन घेत असून, निर्यातीसाठी विशेष मागणी होत आहे. कलिंगडसह सर्व प्रकारच्या भाज्या व अन्य उत्पादन विक्रीसाठी धामणी येथे दोन व चिपळूण किंवा रत्नागिरीत एक स्टाॅल लावण्याचा पर्यायही त्यांनी काढला आहे. सलग दोन वर्षे लाॅकडाऊनचा फटका बसला. गावात काेरोना रुग्ण सापडल्याने कलिंगड विक्री न झाल्याने माल सडला, नुकसान खूप झाले. तरीही न डगमगता गटाची वाटचाल सक्रिय आहे.
सेंद्रिय शेतीवर भर
रासायनिकऐवजी सेंद्रिय शेतीवर या गटाचा विशेष भर आहे. ‘एकीचे बळ मिळते फळ’ याप्रमाणे श्रीमंत बळीराम सेंद्रिय गट सामूहिक परिश्रमातून यशस्वी वाटचाल करीत आहे. पालापाचोळ्यापासून तयार केलेले गांडूळ खत, तसेच जीवांमृताचा वापर ते करीत आहे. येथे आधुनिक तंत्राचा अवलंब केला आहे. उत्पादन व दर्जा दोन्हीबाबतीत गटाने ठसा उमटविला आहे. या गटाने शेतकरी कंपनीचीही स्थापना केली आहे आहे. अन्य शेतकऱ्यांनाही गटातर्फे लागवडीसाठी मार्गदर्शन करीत आहेत. दर्जामुळे विक्री सोपी झाली आहे.