फरार संशयित आरोपी सापडला तब्बल ११ वर्षांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:21 AM2021-06-17T04:21:59+5:302021-06-17T04:21:59+5:30
रत्नागिरी : सावर्डे येथे ११ वर्षांपूर्वी अपघात करून फरार झालेल्या संशयित आरोपीच्या सोमवारी धुळे येथे मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांच्या ...
रत्नागिरी : सावर्डे येथे ११ वर्षांपूर्वी अपघात करून फरार झालेल्या संशयित आरोपीच्या सोमवारी धुळे येथे मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांच्या ‘पाहिजे आणि फरारी शोध पथका’ने ही कारवाई केली. नजमुद्दीन सोराब खान (४८, रा. शिवडी, मुंबई ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
९ डिसेंबर २०१० रोजी सावर्डे येथील गिजगीजमा मशिदीसमोर रस्ता ओलांडऱ्या पादचाऱ्याला तवेरा गाडीने धडक दिली होती. अपघातानंतर तो फरार झाला होता. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात मोटार ॲक्ट १८४ नुसार त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पाहिजे आणि फरारी शोध पथका’ची स्थापना करण्यात आली. त्यातील पोलीस निरीक्षक शैलजा सावंत, पोलीस नाईक चंदन जाधव, सत्यजीत दरेकर, प्रवीण खांबे आणि पोलीस कॉन्स्टेबल मुजावर यांनी ही कारवाई केली.