कोंडफणसवणेतील विकास कामांसाठी १० लाख रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:37 AM2021-09-04T04:37:57+5:302021-09-04T04:37:57+5:30
चिपळूण : तालुक्यातील कोंडफणसवणे येथे विकास कामांसाठी आमदार शेखर निकम यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ...
चिपळूण : तालुक्यातील कोंडफणसवणे येथे विकास कामांसाठी आमदार शेखर निकम यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील विविध विकास कामांसाठी भेट घेतली असता, त्यांनी तत्काळ १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
कोंडफणसवणे ग्रामपंचायतीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस गटाने निर्विवाद सत्ता मिळवली होती. त्यानंतर कोंडफणसवणे गावातील नवनिर्वाचित सरपंच वैशाली जीनगरे, उपसरपंच सुरेश शिगवण, सदस्य संकेत पवार, प्रणिता पवार, प्रिया जाधव, पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, ग्रामस्थ अप्पासाहेब इंदुलकर, श्यामराव कदम, बाळू जाधव यांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेतली. यावेळी आमदार निकम यांनी त्यांचा सत्कार केला. पहिल्याच टप्प्यात दहा लाखांची दोन कामे मंजूर केली. तसेच अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या तीन स्मशानशेडपैकी एका नवीन स्मशानशेडसाठी व बाकी संरक्षक भिंत आणि डागडुजीसाठी तत्काळ निधी देण्याचे वचन दिले. त्याचबरोबर जल जीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले. या गावात योजना राबविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. भविष्यातही असाच भरघोस निधी दिला जाईल.
कोंडफणसवणे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याबद्दल युवानेते बाबू साळवी यांचे आमदार निकम यांनी कौतुक केले. सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी लोकाभिमुख कारभार करण्यावर भर द्यावा. बाबू साळवी यांचा विकास कामांसाठी नियमित पाठपुरावा सुरू असतो. त्यामुळे कोंडफणसवणे येथील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे आश्वासन आमदार निकम यांनी दिले.