निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:30 AM2021-04-17T04:30:41+5:302021-04-17T04:30:41+5:30
व्यापाऱ्यांची आज बैठक चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथे व्यापाऱ्यांची बैठक शनिवार दिनांक १७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली ...
व्यापाऱ्यांची आज बैठक
चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथे व्यापाऱ्यांची बैठक शनिवार दिनांक १७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. सचिन कोकाटे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे.
खड्डे बुजविले
खेड : तालुक्यातील वेरळ रेल्वे स्थानकापासून भोस्त मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र, हा रस्ता निकृष्ट झाला असून, केवळ खड्डे बुजवून मुलामा करण्यात आला आहे. निकृष्ट काम असल्याने वारंवार खड्डे पडत असून, वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत आहेत.
थांबा रद्द
खेड : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसचा रोहा येथील थांबा रद्द करण्यात आला आहे. गेले २३ वर्षे सुरू असलेला हा थांबा रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. हा थांबा पूर्ववत करावा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
इंटरनेट सेवेचा बोजवारा
खेड : शहरासह ग्रामीण भागात भारत संचार निगम सेवेसह खासगी मोबाइल कंपनीची सेवा कोलमडली असून, इंटरनेट सेवेचा बोजवारा वाजला आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये व बँकांमधील कामकाजावर याचा परिणाम होत आहे. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने विविध कामे खोळंबली आहेत. याचा ग्राहकांना त्रास होत आहे.
विद्युत वाहिन्या जोडणी पूर्ण
रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी गाव विद्युत जोडणीच्या माध्यमातून पूर्णगडला जोडल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. या आधी हे गाव राजापूर तालुक्यातील धारतळे रोहित्राला जोडलेले होते. गावखडीला होणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित व कमी दाबाने होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत होती.
नुकसान भरपाईची मागणी
रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचा झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, तसेच कोकणातील शेतकऱ्यांच्या काजू बीला योग्य किंमत मिळावी, अशी मागणी जिल्हा बागायतदार संघटनेने केली आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.