पुलासाठी निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:17+5:302021-06-26T04:22:17+5:30
दापोली : मुरुड सालदुरे गावाकडून मुरुडकडे येणाऱ्या नदीवर असलेल्या पुलाची दुरवस्था झाली आहे. याबाबत सातत्याने दुरुस्तीची मागणी झाल्याने अखेर ...
दापोली : मुरुड सालदुरे गावाकडून मुरुडकडे येणाऱ्या नदीवर असलेल्या पुलाची दुरवस्था झाली आहे. याबाबत सातत्याने दुरुस्तीची मागणी झाल्याने अखेर दुरुस्तीसाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दिवाळीपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाच्या दुरुस्तीला प्रारंभ होणार आहे.
गावांमध्ये दररोज तपासणी
रत्नागिरी : तालुक्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या चार गावांमध्ये दररोज कोरोनाविषयक तपासणीचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या तालुक्यात पॉझिटिव्हिटीचा दर ११.२८ टक्के इतका आहे. त्यामुळे हातखंबा, चांदेराई, पावस या गावांमध्ये दररोज कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.
शैक्षणिक साहित्य वाटप
खेड : तालुक्यातील १८ गाव मोरे, राव परिवार संचलित कुंभाळजाई देवी सामाजिक संस्थेच्यावतीने किंजळे येथील श्रीमती सरस्वती रावजीशेठ जाधव हायस्कूलला शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तके तसेच तीन कपाटे, खुर्च्या देण्यात आल्या.
साप्ताहिक स्पेशल
आवाशी : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे मे महिन्यापासून बंद करण्यात आलेल्या एका सुपरफास्ट स्पेशलसह अन्य तीन साप्ताहिक स्पेशल पुन्हा कोकण रेल्वे मार्गावर सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यात हाप्पा - मडगाव, भावनगर - कोच्युवेली, पोरबंदर - कोच्युवेली, इंदौर - कोच्युवेली या गाड्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
चिपळूण : कृषी विभागातर्फे गावोगावी राबविण्यात येणाऱ्या कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत तालुक्यातील कळंबट येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना मग्रारोहयो फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, गिरीपुष्पाचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
बससाठी निवेदन
खेड : शेतकऱ्यांना लागणारी शेतीची अवजारे, बियाणे, खते घेण्यासाठी येथील बाजारपेठेत यावे लागते. मात्र, खेड - वडगाव ही बसफेरी बंद असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही बसफेरी तातडीने सुरु करुन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पर्यटकांवर कारवाई
रत्नागिरी : तालुक्यातील पिरंदवणे - टोळवाडी बंधाऱ्याखालील धबधब्यावर आलेल्या ३० पर्यटकांवर ग्रामीण पोलीस, ग्रामपंचायत यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली. सध्या कोरोनाचा संसर्ग वेगात वाढू लागला आहे. प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी बंदी केली आहे. तरीही सध्या भरुन वाहणाऱ्या धबधब्यांवर पर्यटक गर्दी करत आहेत.
बससेवा सुरु
दापोली : येथील आगारातून सकाळी ८ वाजता दापोली - आंजर्ले - केळशी बससेवा सुरु झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गतवर्षी चक्रीवादळाने पाडली उभी धोंड रस्त्याखालील भराव वाहून गेल्याने रस्ता नादुरुस्त झाला होता. आता रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने दापोलीद - आंजर्ले - केळशी बससेवा सुरु झाली आहे.
बसस्टॉपची दुर्दशा
खेड : तालुक्यातील धामणंद फाटा बसस्टॉपची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे याठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. १९९६ - ९७ साली आमदार रवींद्र मिर्लेकर यांच्या आमदार फंडातून हा बसस्टॉप बांधण्यात आला होता. मात्र, गेल्या २५ वर्षांत परिवहन महामंडळाकडून या बसस्टॉपच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची दुर्दशा झाली आहे.
शिष्यवृत्ती ऑफलाईन
रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण पूर्व विभागाकडून मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ही योजना ३० सप्टेंबर २०२१पर्यंत थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेतून वगळण्यात आली आहे. ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहे.