संगमेश्वर पंचायत समितीकडून देवरुख काेविड सेंटरसाठी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:40 AM2021-04-30T04:40:22+5:302021-04-30T04:40:22+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरकरिता संगमेश्वर पंचायत समितीकडून तालुका यंत्रणेला एक लाख ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरकरिता संगमेश्वर पंचायत समितीकडून तालुका यंत्रणेला एक लाख ११ रुपये मदत करण्यात आली आहे. ही मदत गुरुवारी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते देवरुखचे तहसीलदार सुहास थोरात यांच्याकडे देण्यात आली.
यावेळी माजी आमदार सुभाष बने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, सभापती जयसिंग माने, रत्नागिरी -सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवसेना संघटक नेहा माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक प्रद्युम्न माने, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, साहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती गाट उपस्थित होते.
संगमेश्वर पंचायत समिती कार्यालयांतर्गत पंचायत समिती सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, बांधकाम उपविभाग देवरुखचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षण विभागाचे कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी संघटना अशा सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून रोख रक्कम रुपये एक लाख ११ हजार रुपये खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते देण्यात आले.
तसेच पंचायत समितीतर्फे दानशूर व्यक्तींना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार संगमेश्वर तालुका ठेकेदार असोसिएशनतर्फे १०० इलेक्ट्रिक केटल्स देण्यात आले आहेत. जनक जागुष्टे यांच्याकडून १ हजार लिटर क्षमतेच्या तीन पाणी साठवण टाक्या, तसेच केमिस्टस असोसिएशन, देवरुख यांच्याकडून ग्लोव्हज पाच बॉक्स, मास्क १०० व व्हिटॅमिन सी गोळ्या - २००० अशा प्रकारे मदत स्वरूपात पंचायत समितीच्या माध्यमातून देण्यात आले आहे. याबरोबरच पंचायत समितीच्या सेसमधून कॉट खरेदी करण्यासाठी सुमारे सव्वा लाखाचा निधी तत्काळ मंजूर करण्यात आला आहे.
.........................................
खासदार विनायक राऊत यांचे हस्ते तहसीलदार सुहास थोरात यांच्याकडे गुरुवारी पंचायत समितीकडे मदत देण्यात आली.