निधी वाटपावरुन सत्ताधाऱ्यांतच जुंपली
By admin | Published: March 30, 2016 10:32 PM2016-03-30T22:32:05+5:302016-03-30T23:58:45+5:30
चिपळूण पंचायत समिती सभा : कुटरे गणातील कामाला प्रशासकीय मंजुरी न देण्याचा ठराव
चिपळूण : चिपळूण पंचायत समितीच्या मासिक सभेत बुधवारी दोन माजी सभापतींमध्ये शाब्दिक द्वंद्व रंगले. सेस व वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून हा वाद सुरु आहे. यापुढे कुटरे गणातील कोणत्याही प्रस्तावित कामाला प्रशासकीय मंजुरी देऊ नये किंवा कामांची बिलेही काढू नयेत, असा ठराव मंजूर करण्यात आला. सत्ताधारी गटाच्या सदस्यांमध्ये जुंपली असताना ज्येष्ठ सदस्य व आजी - माजी सभापती गप्प होते.
इतिवृत्त वाचन सुरु असताना कुटरे गणात सेसमधून ९० लाखाची कामे व तेराव्या वित्त आयोगातून ३५ लाख रुपयांची कामे झाली आहेत. यावर सत्ताधारी सदस्य, राष्ट्रवादीचे गटनेते जितेंद्र चव्हाण यांनी मागील सभेत व आजच्या सभेतही आक्षेप घेतला. शिवसेनेच्या सदस्यांनी याबाबत आवाज उठवला. त्यामुळे जितेंद्र चव्हाण यांनी यापुढील कामाला प्रशासकीय मान्यता देऊ नये, असा ठराव मांडला असता शिवसेनेचे दीपक वारोसे यांनी त्याला अनुमोदन दिले. त्यामुळे हा ठराव मंजूर झाला. एकाच गणात कामे झाल्याने इतर गणांवर अन्याय झाला असल्याची भावना अभय सहस्त्रबुध्दे, रघु ठसाळे, पूनम शिंदे, दिलीप मोरे यांच्यासह उपसभापती नंदकिशोर शिर्के यांनीही मांडली. यावेळी सभापती मेस्त्री, माजी सभापती सुरेश खापले व समीक्षा बागवे शांत बसून होते.
संतोष चव्हाण यांनी ही अडीच वर्षातील कामे आहेत. सभागृहाने सर्व कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे असा ठराव मांडता येणार नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. खुर्चीवर बसल्यावर आपण काहीही करणार काय? असे पप्या चव्हाण यांनी विचारताच आपण अडीच वर्षे होतात कुठे? असे संतोष चव्हाण यांनी विचारले. दोघांमध्ये बराच वेळ शाब्दिक खडाजंगी सुरु होती. विरोधक संतोष चव्हाण यांचे ऐकूनच घेत नव्हते. एकाच गणात ९० लाख रुपये खर्ची पडताना आम्हाला १ लाख रुपयेही मिळू नयेत, ही दुर्दैवाची बाब आहे, हा अन्याय आहे. ही कामे झाली कशी? याचा खुलासा करावा, असे ठसाळे यांनी विचारता गटविकास अधिकारी पाटील म्हणाल्या, गेल्या सहा महिन्यात एकाही नवीन कामाला प्रशासकीय मान्यता दिलेली नाही. केवळ समाजकल्याणमधील कामे झाली आहेत, असे त्या म्हणाल्या. त्याखेरीज कोणत्याही कामाला प्रशासकीय मान्यता दिलेली नाही. जी कामे आहेत ती तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांच्या काळातील आहेत. सभापती मेस्त्री यांचा या कामाशी संबंध नाही. या प्रकरणी प्रशासनाची भूमिका निसंदिग्ध असल्याने प्रशासन दोषी आहे, असे ठसाळे म्हणाले.
अतिशय मार्मिक शब्दांत ठसाळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाने प्राधान्यक्रमाने कामांना मंजुरी न दिल्याने ही अनियमितता झाली आहे. उपसभापती शिर्के यांनी यापूर्वीच हा विषय मांडला होता. आता यापुढे छाननी करुन प्राधान्यक्रमाने कामे घ्या व महिला सदस्यांनाही कामे द्या, असे सुचविण्यात आले. (प्रतिनिधी)
आजच्या सभेत डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळालेले खरवते प्राथमिक आरोग्य केंद्र व कळंबट उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. खरवते आरोग्य केंद्राला जिल्ह्याच्यावतीने राज्यस्तरावर नामांकित करण्यात आले असल्याने ही बाब आपल्या तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी यावेळी सांगितले.
गुणवत्ता विकास योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा, निवळी नं. १ प्रथम, द्वितीय क्रमांक कळवंडे माडवाडी शाळेला तर तृतीय क्रमांकासाठी तळवडे शाळा नं. १ व जिल्हा परिषद शाळा, दळवटणे बागवाडी यांना विभागून देण्यात आला असून, सभापती स्नेहा मेस्त्री, उपसभापती नंदकिशोर शिर्के, गटविकास अधिकारी शुभांगी पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
पंचायत समितीच्या प्रत्येक खात्यात खाबुगिरी चालते. सगळी प्रकरणे बाहेर काढू का? कोंबड्या, बकऱ्या गेल्या कुठे? हे बाहेर काढले तर अडचण होईल. सर्वांना सर्व माहीत आहे. उगीच बोलायला लावू नका. पंचायत समिती लुटायचे काम काहींनी केले आहे. त्यांची भांडी फोडू का? असे राष्ट्रवादीचे गटनेते जितेंद्र चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सांगितले.