जगबुडी किनारी संरक्षक भिंतीसाठी निधी देणार : वडेट्टीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:29 AM2021-07-26T04:29:26+5:302021-07-26T04:29:26+5:30
खेड : जगबुडी नदीच्या पुराचे पाणी ज्या ठिकाणाहून बाजारपेठेत शिरते त्या ठिकाणी जगबुडी नदीकिनारी संरक्षक भिंत ...
खेड : जगबुडी नदीच्या पुराचे पाणी ज्या ठिकाणाहून बाजारपेठेत शिरते त्या ठिकाणी जगबुडी नदीकिनारी संरक्षक भिंत बांधण्यासाठी आवश्यक निधी तातडीने देण्यात येईल, अशी घाेषणा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खेड येथे रविवारी केले.
पूरग्रस्त खेड बाजारपेठेला राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी खेड येथे भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करून व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश कीर, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, खेड नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे उपस्थित होते.
वडेट्टीवार यांनी बाजारपेठेतील पूरग्रस्त निवाचा चौक, गांधी चौक, वाल्की गल्ली, साठी मोहल्ला, पाैत्रिक मोहल्ला, गुजरआळी या परिसरातील सर्व नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
जगबुडी नदीवर संरक्षक भिंतीचा प्रस्ताव आमदार योगेश कदम यांनी तत्काळ माझ्याकडे सादर करावा त्यांना शासनाकडून तत्काळ मंजुरी देण्यात येईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. पूरग्रस्त असलेल्या प्रत्येक कुटुंबीयांना १५ हजार रुपये रोख मदत तत्काळ देण्याचे त्यांनी महसूल विभागाला आदेश दिले.
कायमस्वरूपी एनडीआरएफ पथक तैनात करणार
खेड, चिपळूण व अन्य कोकणातील तालुक्यांसाठी रत्नागिरी येथे कायमस्वरूपी एनडीआरएफ पथक तैनात करण्यात येईल. खेडसाठी शासनाकडून आपत्कालीन परिस्थितीसाठी पाच यांत्रिक बोटी तातडीने देण्यात येतील, असेही आश्वासन यावेळी दिले. कोकणातील दरडग्रस्त धोकादायक गावातील लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.