गुहागरात नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:32 AM2021-04-27T04:32:07+5:302021-04-27T04:32:07+5:30
गुहागर : गेल्या काही दिवसात तालुक्यातही रुग्ण कोरोनामुळे मृत होण्याचे प्रमाण वाढत आहे. यातूनच मागील पंधरा दिवसात कोरोनामुळे गुहागर ...
गुहागर : गेल्या काही दिवसात तालुक्यातही रुग्ण कोरोनामुळे मृत होण्याचे प्रमाण वाढत आहे. यातूनच मागील पंधरा दिवसात कोरोनामुळे गुहागर ग्रामीण रुग्णालयात मृत झालेल्या सुरळ, गिमवी, वेळंब व पालशेत येथील चार कोरोनाग्रस्तांना नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी अग्नी देऊन आपले कर्तव्य पार पाडले आहे.
यापूर्वी तालुक्यात ऑक्सिजन सुविधा नसल्याने कामथे किंवा रत्नागिरी शासकीय रुग्णालयात येथील रुग्णांना नेले जात होते. गतवेळी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्याही कमी होती व तुलनेने मृत होण्याचे प्रमाणही खूपच कमी होते. तालुक्यातील एखादा रुग्ण मृत झाल्यास चिपळूण किंवा रत्नागिरी येथे शासकीय नियमानुसार मृत रुग्णांच्या नातेवाईकांना बोलावून अग्नी दिला जात होता. यावेळी जिल्हाभरात वाढणारे रुग्ण व आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी गुहागर ग्रामीण रुग्णालयातही ऑक्सिजन सुविधा सुरू करण्यात आली. यामध्ये ३० बेडची व्यवस्था असून यामध्ये १० ऑक्सिजन सुविधायुक्त बेड आहेत. जिल्ह्यात बेड उपलब्ध नसल्याने तालुक्यात अनेक रुग्ण सध्या गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल होत आहेत. यातूनच गंभीर स्वरूपातील रुग्णांचे मृत होण्याचे प्रमाणही गेल्या काही दिवसात वाढते आहे. साखरीत्रिशूळ येथील मृत झालेल्या रुग्णाला तब्बल पाच तास शववाहिकेची वाट पाहावी लागली होती. यानंतर येथील सरपंच व ग्रामस्थांनीच मृतदेह गावी नेऊन अंत्यसंस्कार केले होते. या घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. यानंतर गुहागर नगरपंचायतीने पुढाकार घेत मृत व्यक्तीवर गुहागर शहर बाजारपेठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. यामध्ये सुरळ, गिमवी, वेळंब, पालशेत येथील चार मृत रुग्णांचा समावेश आहे.
याबाबत नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी सांगितले की, शासनाने दिलेल्या जबाबदारीत गुहागर नगरपंचायत कुठेही कमी पडणार नाही. सुरुवातीच्या काळात ग्रामीण रुग्णालय, प्रशासन व नगरपंचायत भागामध्ये समन्वयाचा अभाव होता. मात्र झालेल्या चुका सुधारून नगरपंचायतीमार्फत आपले कर्तव्य योग्य पार पाडले जात आहे.
यासाठी नियोजन करण्यात आले असून अशाप्रकारे मृत रुग्णांना अग्नी देण्यासाठी नगरपंचायत सफाई कामगार व कर्मचाऱ्यांची १० जणांची टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी आवश्यक लाकूडफाटा वाढवण्यात आला आहे. सध्या तरी उपलब्ध ठिकाणी मृतदेह जाळले जात आहेत. दुसऱ्या दिवशी लगेचच मृतदेहाची राख जमा करून सुरक्षित ठिकाणी पुरली जात आहे. पुढील काही काळात कोरोनामुळे मृत होणाऱ्यांचे मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमीच्यालगत वेगळी व्यवस्था नगरपंचायतीकडून केली जात आहे.
गुहागर शहरात दोन कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांच्या घरातील वृद्ध महिला मृत्यू पावल्याच्या घटना गेल्या चार दिवसात घडल्या. यावेळी नगरपंचायतीकडून नातेवाईकांना मृतदेह जाळण्यासाठी पीपीई कीट देण्यात आले. नगरपंचायतीने २०० पीपीई कीट खरेदी केले होते. सद्यस्थितीत १२५ पीपीई कीट उपलब्ध आहेत. आणखी कीट नगरपंचायत खरेदी करत असल्याचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी सांगितले.