अंत्यसंस्कार एकमेकांच्या सहकार्याने करावे : अमाेल गाेयथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:30 AM2021-05-16T04:30:35+5:302021-05-16T04:30:35+5:30
असगोली : कोरोना आजारामुळे मृत पावलेल्यांचा अंत्यसंस्कार त्या-त्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्या सहकार्याने करावे, ...
असगोली : कोरोना आजारामुळे मृत पावलेल्यांचा अंत्यसंस्कार त्या-त्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्या सहकार्याने करावे, असे निवेदन गुहागर नगरपंचायतीचे नगरसेवक आरोग्य सभापती अमोल गोयथळे यांनी पंचायत समिती गुहागर यांच्याकडे केले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गुहागरमध्ये कोरोना विषाणूचा प्रचंड वाढता प्रादुर्भाव आहे. तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय हे गुहागर नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिक उपचारासाठी येतात. ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सोयीसुविधांमुळे कोरोना रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. सुरुवातीला कोरोना मृत्यू झाला तर त्या-त्या ग्रामपंचायतीतर्फे मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र, आता ग्रामीण रुग्णालयामधील आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला तर त्यांचे अंत्यसंस्कार नगरपंचायतीतर्फे करावे लागत आहेत. नगरपंचायतीचे एकूण सफाई कामगार दहा असून, एक गैरहजर आहे. नऊ कर्मचाऱ्यांपैकी एक महिला सफाई कामगार आहे. दोन कामगार आजारी आहेत. त्यामुळे सहा सफाई कामगारांकडून अंत्यसंस्कार, फवारणी, पावसाळा जवळ येत असल्याने नालेसफाई व इतर दैनंदिन कामकाज करणे शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे अंत्यसंस्कार त्या-त्या ग्रामपंचायतीने करावे. जेणे करून नगरपंचायत कामगारांवर पडत असलेला ताण कमी होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.