न थकता ‘ते’ करतायेत मृतदेहांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:33 AM2021-04-28T04:33:48+5:302021-04-28T04:33:48+5:30
खेड : काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबराेबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी खेड नगरपरिषदेच्या स्वच्छता ...
खेड : काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबराेबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी खेड नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांवर साेपविण्यात आली आहे. गतवर्षीपासून ही मंडळी आपल्यावर साेपविलेली ही जबाबदारी न थकता अविरतपणे सांभाळत आहेत.
गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गात वाढ झाल्यानंतर एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित रुग्णाचा खेडमध्ये पहिला मृत्यू झाला होता. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मृतांचा आकडा वाढला होता. खेड तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास शहरातील नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. यासाठी एक नोडल ऑफिसर, दोन सहायक, एक जेसीबी चालक व पाच सफाई कामगार असे एकूण आठजणांचे पथक चोवीस तास कार्यरत आहे. या पथकामध्ये नोडल ऑफिसर म्हणून नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा निकम व महेंद्र जाधव हे दोन सहायक म्हणून काम करतात.
नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी आपल्या नियमित जबाबदाऱ्या पूर्ण करून अंत्यसंस्कार करण्याचे जोखमीचे काम करीत आहेत. या कामासाठी कोणताही अतिरिक्त भत्ता शासनाकडून देण्यात येत नाही. हे काम करताना अंगावर पीपीई कीट चढवून सुमारे तीन तास हे कर्मचारी ऊन असो व पाऊस, आपले काम करीत आहेत. मृतदेह व रुग्णवाहिकेचे सॅनिटायझेशन करणे, तसेच सोबत आलेल्या नातेवाईकांना धीर देण्याचा प्रयत्नही हे कर्मचारी करतात. मार्च ते पावसाळा सुरू होईपर्यंत रणरणत्या उन्हात पीपीई कीट घालून अंत्यसंस्कार करणाऱ्या पथकातील हे कर्मचारीच खरे काेविड याेद्धे ठरत आहेत.
..............................
काेविड याेद्धे
प्रत्यक्ष मृतदेहांवर अंत्यसंस्कार पूर्ण करण्याचे काम सतीश इंगवले, अनिल चव्हाण, सुनील जाधव, अरविंद सावंत, स्वप्नील जाधव व रामचंद्र सावंत हे पाच कर्मचारी करतात. रुग्णालयातून रुग्णवाहिकेने मृतदेह स्मशानभूमीत आणल्यानंतर तो ताब्यात घेऊन सरणावर ठेवून अग्नी देण्याचे काम हे कर्मचारी गेले वर्षभर रात्री-अपरात्री करीत आहेत.