रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गजानन पाटील
By मेहरून नाकाडे | Published: May 29, 2023 05:15 PM2023-05-29T17:15:23+5:302023-05-29T17:15:44+5:30
पाटील यांची दुसऱ्यांदा सभापतीपदी वर्णी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गजानन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसभापतीपदी सुरेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी एप्रिलमध्ये निवडणूक झाली होती. या निवडणूकीत सर्व पक्षिय ‘सहकार पॅनल’ ने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद यश संपादन केले होते. एकूण ११ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. बाजारसमितीसाठी सहकार पॅनलमधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस, ठाकरे सेना, शिंदे सेना असे सर्वच पक्ष एकत्र आले होते. मात्र तीन अपक्ष उमेदवारामुळे निवडणूक घ्यावी लागली होती.
सहकार पॅनलचे हेमचंद्र माने (भाजप), गजानन पाटील (शिंदे सेना) सुरेश कांबळे (राष्ट्रवादी) हे तीन संचालक आधीच बिनविरोध निवडून आले होते. अकरा जागांमध्ये अरविंद आंब्रे (राष्ट्रवादी) विजय टाकळे (राष्ट्रवादी), मधुकर दळवी (शिंदे सेना), नैनेश नारकर (ठाकरे सेना ), रोहित मयेकर (शिंदे सेना), सुरेश सावंत (राष्ट्रवादी), संदीप सुर्वे (ठाकरे सेना), स्मिता दळवी (राष्ट्रवादी), स्नेहल बाईत (ठाकरे सेना), ओंकार कोलगे (शिंदे सेना), प्रशांत शिंदे (ठाकरे सेना) विजयी झाले होते.
सभापती, उपसभापती पदाची निवडूक सोमवारी (दि.२९ मे) झाली. सभापतीपदी गजानन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. पाटील यांची दुसऱ्यांदा सभापतीपदी वर्णी लागली आहे. सुरेश सावंत (गुहागर ) यांची उपसभापतीपदी निवड झाली. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आपल्या निवडीमागे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत, तानाजीराव चोरगे, बाबाजी जाधव, आमदार शेखर निकम यांचे योगदान असल्याचे नूतन सभापती गजानन पाटील यांनी सांगितले.