पेण येथील गणपती कोकण रेल्वेने रत्नागिरीत दाखल, गणेश चतुर्थीची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 02:34 PM2019-07-09T14:34:40+5:302019-07-09T14:35:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अवघ्या भक्तांच्या लाडक्या बाप्पाच्या अर्थात गणेश चतुर्थी उत्सवाला दि. २ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : अवघ्या भक्तांच्या लाडक्या बाप्पाच्या अर्थात गणेश चतुर्थी उत्सवाला दि. २ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. अद्याप पावणे दोन महिन्यांचा अवकाश असला तरी गणेश मूर्ती कार्यशाळेत मूर्ती रेखाटण्याचे काम सुरू झाले आहे. पेणच्या गणेशमूर्तीचे भक्तांना प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे काही मूर्तिकार बांधव पेणहून गणेशमूर्ती आणत आहेत. रेल्वेने गणेशमूर्ती आणण्यात येत आहेत.
बहुतांश मूर्तिकार बांधव अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गणपतीसाठी माती भिजवतात. शाडूच्या गणेशमूर्ती रेखाटण्यात येतात. शाडूच्या गणेशमूर्ती वाळण्यास अवधी लागतो. या मूर्ती वाळल्यानंतरच रंगकाम सुरू होते. अनेक मूर्तिकार लाल मातीपासूनही गणेशमूर्ती तयार करीत आहेत.
गणेश मूर्ती रेखाटणाऱ्या कारखान्यात शाडूपासून मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. कोरीव काम असल्यामुळे रेखाटण्यास उशिर लागतो. त्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता भासते. सध्या भात लागवडीची कामे सुरू असल्याने मजुरांची उपलब्धता होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
पेणच्या गणेशमूर्तींना भाविकांकडून विशेष मागणी असते. त्यामुळे अनेक व्यावसायिक पेण येथून रेल्वेने गणेशमूर्ती रत्नागिरीत घेऊन येतात. खासगी वाहनांपेक्षा रेल्वेतून गणेशमूर्ती सुरक्षित आणण्यास मदत होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. रत्नागिरीत आणण्यापूर्वी केवळ पांढरा रंग देऊन मूर्ती आणल्या जातात. मात्र, रत्नागिरीत गणेशमूर्ती आणल्यानंतर रंगकाम केले जाते. सध्या रंगकाम न केलेल्या गणेशमूर्ती रेल्वेतून सुरक्षित आणण्यात येत आहेत.
श्रावण निम्मा झाला की, मूर्तिकार रंगकामाला प्रारंभ करतात. शहरात तर पेणच्या रंगकाम तयार केलेल्या गणेशमूर्ती विक्रीचे दालन उभारले जाते. शाडू माती गुजरात राज्यातून आणली जाते. इंधन दरातील वाढीमुळे शाडू माती, रंग साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. शिवाय मजुरीतील वाढीमुळे यावर्षी किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.