दीपोत्सवाने उजळला गणपतीपुळे परिसर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 05:23 PM2022-11-08T17:23:41+5:302022-11-08T17:24:00+5:30
गणपतीपुळे येथे ‘श्रीं’च्या मंदिरामध्ये कोजागरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या महिन्याभराच्या कालावधीत दररोज सायंकाळी सात वाजता दिव्यांच्या प्रकाशात आरती करण्यात येते,
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या महिनाभर चालणाऱ्या दीपोत्सवाची सांगता सोमवारी (७ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजता करण्यात आली. सायंकाळी आरती केल्यानंतर दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरात ‘श्रीं’समोर लावलेले दिवे आणि मंदिर परिसरात लावलेल्या दिव्यांमुळे परिसर दिव्यांच्या प्रकाशांनी उजळून निघाला होता.
गणपतीपुळे येथे ‘श्रीं’च्या मंदिरामध्ये कोजागरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या महिन्याभराच्या कालावधीत दररोज सायंकाळी सात वाजता दिव्यांच्या प्रकाशात आरती करण्यात येते, तसेच दर दिवशी वेगवेगळ्या व्यक्तीला आरतीला उभे राहण्याचा मान दिला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी आरतीला उभे राहण्याचा मान श्रीदेव गणपतीपुळे संस्थानाच्या कर्मचाऱ्याला दिला जातो.
कोजागरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा साजऱ्या होणाऱ्या दीपोत्सवाची सांगता सोमवारी हजारो तेलाच्या दीप, पणत्यांच्या झगमगाटात धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. हजारो दिव्यांच्या रोषणाईने मंदिर परिसर तेजोमय, तेजस्वी आणि सकारात्मकतेच्या लखलखाटात न्हाऊन निघाला होता.
सर्व धार्मिक कार्यक्रम, आरती, मंत्रपुष्पांजली, प्रार्थना इत्यादी श्रीदेव गणपतीपुळे संस्थान पंच कमिटी आणि मंदिराचे मुख्य पुजारी अमित प्रभाकर घनवटकर व त्यांच्या सहकाऱ्यांतर्फे पार पाडण्यात आले. महिनाभराच्या कालावधीत हा कार्यक्रम पार पडण्यासाठी मुख्य पुजारी अमित घनवटकर व अभिजीत घनवटकर व सहकारी, ग्रामस्थ, संस्थानचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली. त्याचे भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.