गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा पर्यटकांसाठी खुला, बिपोरजॉय वादळामुळे होता बंद
By अरुण आडिवरेकर | Updated: June 24, 2023 13:32 IST2023-06-24T13:29:20+5:302023-06-24T13:32:41+5:30
बिपोरजॉय चक्रीवादळामुळे गणपतीपुळे समुद्र चौपाटीवर सुमारे ६ ते ७ फुटांची उंचीची महाभयानक लाट

गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा पर्यटकांसाठी खुला, बिपोरजॉय वादळामुळे होता बंद
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील स्वयंभू तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील गेले काही दिवस बिपोरजॉय वादळामुळे समुद्रकिनारा भक्त पर्यटकांना बंद करण्यात आला होता. आता शुक्रवारपासून (२३ जून) हा समुद्रकिनारा पुन्हा एकदा खुला करण्यात आला आहे.
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या बिपोरजॉय चक्रीवादळामुळे गणपतीपुळे समुद्र चौपाटीवर अचानक सुमारे ६ ते ७ फुटांची उंचीची महाभयानक लाट आल्याने अनेक व्यावसायिकांचे साहित्य समुद्रामध्ये वाहून गेले. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही पर्यटकांनाही थोड्याफार प्रमाणात दुखापत झाली. त्या दिवसापासून गणपतीपुळे समुद्रात जाण्यासाठी पर्यटकांना पूर्णपणे बंदी करण्यात आली होती.
वादळाचे संकट आता संपले असल्याने हा समुद्रकिनारा पुन्हा एकदा खुला करण्यात आला आहे. असे असले तरी समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असून अनेक ठिकाणी समुद्रात चाळ (खड्डे) पडलेले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी समुद्राच्या खोलवर पाण्यात जाऊ नये, असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. या समुद्रकिनाऱ्यावर गणपतीपुळे ग्रामपंचायतीतर्फे जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. मात्र पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
ऐन व्यवसायाच्या दिवसात हे संकट ओढवल्याने पर्यटकांनी गणपतीपुळेगडे पाठ फिरवली. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.