गणपतीपुळेत अंगारकीनिमित्त जोरात तयारी, हजारो भाविक येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 04:41 PM2017-11-06T16:41:12+5:302017-11-06T16:51:51+5:30
गणपतीपुळे परिसरात मंगळवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी अंगारकी चतुर्थीनिमित्त मोठी गर्दी होणार असून, घाटमाथ्यावरुन मोठ्या प्रमाणात भाविक गणपतीपुळेत दाखल होणार आहेत. यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाले असून, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच भाविकांना कोणताही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत प्रशासन मेहनत घेताना दिसत आहे.
गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) ,दि. ०६ : गणपतीपुळे परिसरात मंगळवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी अंगारकी चतुर्थीनिमित्त मोठी गर्दी होणार असून, घाटमाथ्यावरुन मोठ्या प्रमाणात भाविक गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात दाखल होणार आहेत. यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाले असून, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच भाविकांना कोणताही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत प्रशासन मेहनत घेताना दिसत आहे.
अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, मिरज, इस्लामपूर, कºहाड, कवठेमहाकाळ आदी ठिकाणांहून भाविक दाखल होणार आहेत. २०१७ मधील ही शेवटची अंगारकी असल्यामुळे यावेळी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता ग्रामपंचायत गणपतीपुळेतर्फे चोख नियोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सागरदर्शन पार्किंगमध्ये चारचाकी, तीनचाकी, ट्रॅव्हलर, मिनीबस व दोनचाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून, याठिकाणी वाढलेली झाडेझुडपे, कचरा जेसीबीच्या सहाय्याने उचलण्यात आला आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंच महेश ठावरे, अमित घनवटकर, ग्रामपंचायतीचे कर्मचारी सूरज माने व महिला कर्मचारी मेहनत घेताना दिसत होते.
मोरया चौक ते कोल्हटकर तिठा, कोल्हटकर तिठा ते एस. टी. स्टँड परिसर, आपटा तिठा ते कोल्हटकर तिठा व महत्त्वाच्या ठिकाणीही विजेची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्राचा आढावा घेताना अंगारकी कालावधीत कोणती काळजी घ्यावी याबाबत चौपाटीवर तैनात जीवरक्षकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. अंगारकी कालावधीत आपटा तिठा, कोल्हटकर तिठा, मोरया चौक, मंदिर परिसर, मंदिर गाभारा, दर्शन लाईनवर आदी ठिकाणी सुमारे १८० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असून, यामध्ये सुमारे २० अधिकारी व सुमारे १६० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील पेट्रोलिंग, वाहतूक नियंत्रण याकरिता अतिरिक्त पोलिसांना तैनात केले जाणार आहे.