गणपतीपुळे : पर्यटकांची गाडी समुद्रात रुतली, अतिउत्साह नडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 02:27 PM2018-07-03T14:27:40+5:302018-07-03T14:30:55+5:30
गणपतीपुळे येथील समुद्रात सोमवारी साताऱ्यातील पर्यटकांची महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी अडकली. या गाडीला स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने पाण्याबाहेर काढण्यात यश आले. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
गणपतीपुळे : गणपतीपुळे येथील समुद्रात सोमवारी साताऱ्यातील पर्यटकांची महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी अडकली. या गाडीला स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने पाण्याबाहेर काढण्यात यश आले. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
सोमवारी गणपतीपुळे येथे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील पर्यटकांची गाडी चालकाने थेट समुद्र चौपाटीवर नेण्याच्या अतिउत्साही प्रयत्न केला. परंतु हा अतिउत्साह पर्यटकांच्या चांगलाच अंगलट आला.
गणपतीपुळे येथील आपटा तिठ्यातून गणपतीपुळे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गाने ही गाडी समुद्र चौपाटीवर उतरवली. गाडी चौपाटीवर फिरवू नका, असे अनेक स्थानिकांनी सांगितले. त्याकडे दुर्लक्ष करत प्रथम ही गाडी चालकाने कशीबशी काढून पुन्हा समुद्र चौपाटीवर फिरवण्याचा मोठा अतिरेक केला.
मात्र, ही गाडी खोल समुद्राच्या पाण्यात अडकल्याने अखेर या गाडीतील सर्वांनाच स्थानिक ग्रामस्थांकडे मदतीसाठी याचना करावी लागली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी माणूुसकीतून ही गाडी पाण्याबाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले.
समुद्र चौपाटीवरील फोटो व्यावसायिक, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, शहाळे व्यावसायिक व इतर ग्रामस्थांनी गाडी पाण्याबाहेर काढण्यास मदत केली. सुमारे १ तासाच्या प्रयत्नानंतर ही गाडी पाण्याबाहेर आल्याने संबंधित पर्यटकांनी नि:श्वास टाकला.
गणपतीपुळे समुद्रात अडकलेली गाडी ही सातारा जिल्ह्यातील भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षांची होती. तशा प्रकारची पाटी गाडीसमोर लावण्यात आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांनी ही माहिती गणपतीपुळे पोलीस यंत्रणेला दिल्यानंतर या पोलीस दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल मधुकर सलगर यांनी समुद्र किनारी भेट देऊन पाहाणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी गाडी पाण्याबाहेर काढण्यात मोठे यश मिळवले.