गणेशभक्तांनो केवायसी करा अन्यथा सहा हजार विसरा; कृषी विभागातर्फे बॅनर्स लावून जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 09:03 PM2023-09-17T21:03:46+5:302023-09-17T21:05:08+5:30
खेड तालुका कृषि अधिकारी कार्यालयातर्फे गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या नागरिकांना पी. एम. किसान योजनेचे ई- के.वाय.सी. व आधार सिडींग करण्याचे आवाहन केले आहे.
मेहरून नाकाडे -
रत्नागिरी . गणेशभक्तांनो उत्सवानिमित्त गावी आला आहात तर पी.एम किसान योजनेचे ई- के.वाय.सी. व आधार सिडींग लवकरात लवकर करा असे आवाहन कृषी विभागातर्फे ठिकठिकाणी बॅनर्स, फलक लावून करण्यात येत आहे. ‘ई- के.वाय.सी. व आधार सिडींग करा अन्यथा सहा हजार विसरा’, अशीही जनजागृती सुरू आहे.
खेड तालुका कृषि अधिकारी कार्यालयातर्फे गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या नागरिकांना पी. एम. किसान योजनेचे ई- के.वाय.सी. व आधार सिडींग करण्याचे आवाहन केले आहे. तालुक्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी ई-केवायसी करण्याचे आवाहन करणारे बॅनर्स व फलक लावण्यात आलेले आहेत. ई-के.वाय सी. व आधार सिडींग प्रक्रिया पूर्ण न करणारे लाभार्थी वार्षिक मिळणारे सहा हजार रुपयांच्या लाभापासून वंचित राहू शकतात. ई- केवायसी प्रक्रिया वारंवार सांगूनही पूर्ण न करणारे किंवा संपर्क न होणारे लाभार्थी नियमाप्रमाणे कायमचे अपात्र ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया व आधार सीडींग प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन खेड तालुका कृषी अधिकारी रविंद्र माळी यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन किंवा PMKISAN GOI हे प्ले स्टोअर वरील केंद्र शासनाचे अधिकृत ॲप डाउनलोड करून ओ.टी.पी.द्वारे घरबसल्या शेतकरी लाभार्थ्यांना ई-के.वाय.सी.प्रक्रिया पुर्ण करता येऊ शकते. अधिक माहितीसाठी जवळील कृषिसहायक, कृषि पर्यवेक्षक, व मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना संपर्क करावा,असे तालुका कृषि अधिकारी माळी यांनी सूचित केले आहे. यावेळी कृषी सहायक श्री.गणेश काटमोरे, सागर धांडे, किरण वाघमोडे, योगेश पाटीलए पर्यवेक्षक स्वप्नील महाडीक उपस्थित होते.