चित्रशाळेतील मूर्तीकामाने गणेशोत्सवाची चाहूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:31 AM2021-07-31T04:31:57+5:302021-07-31T04:31:57+5:30
पावस : गणेशोत्सवाला एक ते दीड महिन्यांचा अवधी असतानाच रत्नागिरी तालुक्यातील अनेक कलाकारांच्या गणपती कारखान्यात ...
पावस : गणेशोत्सवाला एक ते दीड महिन्यांचा अवधी असतानाच रत्नागिरी तालुक्यातील अनेक कलाकारांच्या गणपती कारखान्यात हरतऱ्हेच्या गणेशमूर्ती आतापासूनच आकार घेऊ लागल्या आहेत. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत मूर्तीच्या किमतीत वाढ होणार आहे.
रत्नागिरी तालुक्यात एक हजार लहान मोठे कारखाने आहेत. दरवर्षी या मोसमातच सर्व कारखान्यात गणेश मूर्ती घडविण्याच्या कामाला सुरुवात होत असते. यावर्षीही तशीच स्थिती आहे. गणेशोत्सवाला एक दीड महिन्यांचा कालावधी असला तरी कमी जास्त दिवसांच्या फरकाने सर्वच गणेश मूर्तीकार आतापासूनच गुंतले आहेत. अनेक कारखान्यात गणेशमूर्ती आकार घेत आहेत.
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीनही जिल्ह्यात प्रत्येकी सुमारे सहा हजारांच्या आसपास गणेश चित्रशाळा आहेत. यातील काही चित्रशाळांचा कानोसा घेतला असता यावर्षी विविध रूपातील गणेशमूर्ती साकारताना दिसतात. गाय, घोडा, गरूड, सिंह, उंदीर यांच्यावर विराजमान झालेल्या बैठ्या, उभ्या अशा अनेक रूपांतील अनेकविध आकाराच्या गणेशमूर्ती ठिकठिकाणी आकार घेऊ लागल्या आहेत.
रत्नागिरी तालुक्यात गणेशमूर्तीसाठी लागणाऱ्या शाडूच्या मातीतून सुमारे लाखो रूपयांची उलाढाल होते. रत्नागिरीतील बहुतांश मूर्तिकार शाडूच्या मातीपासूनच मूर्ती तयार करतात. ही माती कारखानदार मे महिन्याच्या अखेरीस खरेदी करून मूर्ती कामाला प्रारंभ करतात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गणरायाचे मूर्तीकाम करताना छापकाम, जोडकाम, कोरीवकाम, ज्वेलर्सचे हिरे अलंकाराचे सुबक काम, दोन वेळा पाॅलिश अलंकार बनविणे याबरोबरच रंग काम करताना वाॅश, अंगशेड, शेलाधोतर, रेखणी लिक्विड, पाॅलीश, सोनेरी रंग आदी कामे करावी लागतात, असे मूर्तिकार वामन विठ्ठल सुवरे यांनी सांगितले. तसेच यावर्षी मूर्तिकार वामन विठ्ठल सुवरे यांनी कारखान्यात कागदी लगद्यापासून सुबक गणेशमूर्ती साकारलेल्या आहेत.
-------------------------
रत्नागिरी वरचा फगरवठार येथील मूर्तिकार वामन सुवरे यांच्या कारखान्यात गणेशमूर्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.