Ganeshotsav : कोकण रेल्वे प्रशासन गणेशोत्सवासाठी सज्ज, २०० फेऱ्यांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 11:52 AM2018-08-23T11:52:52+5:302018-08-23T11:55:03+5:30
कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर सुमारे २०० फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
रत्नागिरी : कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठीकोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर सुमारे २०० फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण आधीच संपल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांच्या बोगींची संख्या २ ते ४ ने वाढविण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार अजूनही काही फेऱ्या वाढविण्याची शक्यता आहे.
कोकण रेल्वेने २०१८च्या गणेशोत्सवासाठी सुरूवातीला सुमारे दीडशे जादा फेऱ्यांचे नियोजन केले होते. तरीही हजारो लोकांना आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे गणेशोत्सव फेऱ्यांची संख्या वाढवून १८३ करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आटोक्यात येत नसल्याने रेल्वेफेऱ्यांची संख्या आता सुमारे २००पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्यांच्या बोगींची संख्याही गणेशोत्सव काळात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यंदा १३ सप्टेंबरला गणेशोत्सव सुरू होणार आहे. कोकणात घरोघरी श्री गणेशाची पूजा-अर्चा केली जाते. गणेशोत्सव हा कोकणचा दिवाळी सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अर्धी मुंबई या सणासाठी कोकणात उतरते, असे म्हटले जाते. या सणासाठी मुंबईत नोकरी-व्यवसाय करणारे कोकणवासीय मोठ्या संख्येने मिळेल त्या वाहनाने कोकणात येतात.
पहिल्या पाच दिवसात गणेशोत्सव साजरा होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर ९, ११ व १३ दिवसांसाठी गणपतींचे वास्तव्य असते. या काळात कोकण रेल्वेकडून प्रवासी वाहतूक व्यवस्था चांगल्याप्रकारे केली जाते. रेल्वेने गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
कोकण रेल्वे सुरक्षित
कोकण रेल्वेमार्ग अद्यापही एकेरी आहे. त्यामुळे परस्पर विरोधी दिशेने येणाऱ्या गाड्यांना एकेरी मार्गावरून बाजू देताना बराचवेळ जातो. गणेशोत्सव काळात गाड्या उशिराने धावण्याची समस्या निर्माण होते. परंतु, कोकण रेल्वेची वाहतूक सुरक्षित असल्याने व रस्तेमार्गाच्या तुलनेत कोकण रेल्वेने गणेशोत्सवात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आतापासूनच रेल्वे फुल्ल झाली आहे.
जलद गाड्यांनाही थांबे
कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात केलेल्या जादा रेल्वे फेऱ्यांना प्रवाशांच्या सोईसाठी कोकणात बहुतांश स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे येथून रत्नागिरी, सावंतवाडी, थिवीम, मडगाव दरम्यान जादा रेल्वे फेऱ्या धावणार आहेत. जलद गाड्यांच्या थांब्यांमध्येही उत्सवकाळासाठी वाढ करण्यात आली आहे.