साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेला चौसोपीचा गणेशोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 04:45 PM2023-09-21T16:45:20+5:302023-09-21T16:45:36+5:30
सचिन मोहिते देवरुख : तब्बल साडेतीनशे वर्षांची ऐतिहासिक गणेशोत्सवाची परंपरा लाभलेल्या व दृष्टांतातून साकारलेल्या देवरुख शहरातील वरचीआळी येथील चाैसाेपीतील ...
सचिन मोहिते
देवरुख : तब्बल साडेतीनशे वर्षांची ऐतिहासिक गणेशोत्सवाची परंपरा लाभलेल्या व दृष्टांतातून साकारलेल्या देवरुख शहरातील वरचीआळी येथील चाैसाेपीतील जोशी कुटुंबीयांच्या घरी साजरा हाेणारा गणेशोत्सव आगळावेगळा असा आहे. मोरगावच्या मयुरेश्वराप्रमाणे साजरा होणारा हा गणेशोत्सव ‘चाैसाेपीचा गणेशाेत्सव’ म्हणून प्रसिद्ध आहे. आजही नवव्या पिढीतील जोशी कुटुंबीय हा उत्सव साजरा करत आहेत. या उत्सवाला १६ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला.
जोशी घराण्याचे मूळचे बाबा जोशी या एका असाध्य आजाराने पछाडले हाेते. अनेक उपचारानंतरही गुण न आल्याने ते संपूर्ण कुटुंबाचा त्याग करून नजीकच्या देव-धामापुरातील श्रीदेव शंकराच्या देवळात राहण्यास गेले आणि देवाची सेवा करू लागले. त्यावेळी त्यांना ‘‘तू तेथे राहू नकोस, मोरगावला जा आणि मयुरेश्वराची सेवा कर’’ असा दृष्टांत झाला. असाध्य आजारातही त्यांनी मोरगाव गाठले आणि मयुरेश्वराची तपश्चर्या केली. त्यात ते कित्येक दिवस कडुनिंबाच्या रसावर राहिले, पण काही फरक न पडल्याने आमरण सेवेची तपश्चर्या सुरू केली.
त्यानंतर आश्चर्ययुक्त त्यांची व्याधी काही क्षणात नाहीशी झाली. ‘‘तू राहत असलेल्या देवळाच्या खोलीतील ओटीवर खोदाई कर आणि जे काही मिळेल, ते घरी घेऊन जा,’’ असा पुन्हा दृष्टांत झाला. या दृष्टांताप्रमाणे त्यांनी ओटीजवळ खोदले; मात्र हाती काहीच लागले नाही. ते खिन्न झाले आणि त्यांनी अन्न त्यागाचाच निश्चय केला. त्यावेळी पुन्हा दृष्टांत झाला ‘‘तुझी खोदाईची जागा चुकली आहे. मी पिढ्यानपिढ्या तुझ्या घरी राहणार आहे.’’
बाबांनी पुन्हा योग्य जागी खोदाई केली असता, चांदीच्या डब्यात चांदीची श्री सिद्धिविनायकाची उभ्या स्थितीतील उजव्या सोंडेची चार इंच उंचीची चतुर्भुज मूर्ती मिळाली.
या मूर्तीच्या उजव्या हातात पारा आहे. मागील डाव्या हातात परशू, पुढच्या हातात दंड तर डाव्या हातात मोदक आहे. गळ्यात यज्ञोपवितार्थं नाम आहे, डोक्याला मुकुट आहे. पितळी सिंहासनावर कमळामध्ये मूर्ती उभी असून सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सिंह, त्यावर पाचकणी नागाचे छत्र आहे. सिंहासन ८ इंच उंचीचे आहे. ज्या चांदीच्या डब्यात मूर्ती मिळाली, तो डबाही आज पूजेपुढे पाहावयास मिळत आहे.
मयुरेश्वरप्रमाणे उत्सव
‘‘मूर्ती घरी घेऊन जा आणि उत्सव कर’’, या दृष्टांताप्रमाणे बाबांनी देवरुखचे घर गाठले. मोरगावच्या मयुरेश्वर उत्सवाप्रमाणे दृष्टांतातून मिळालेल्या मूर्तीवर उत्सवाची परंपरा सुरू केली. गेली ९ पिढ्या हा उत्सव अव्याहतपणे सुरू आहे. सर्वसाधारणपणे गणेशतुर्थीला गणेशोत्सव सुरू होतो. मात्र, हा उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेस सुरू होतो आणि भाद्रपद शुद्ध पंचमीला उत्सवाची सांगता होते.