गणेशोत्सव प्रबोधनाचे व्यासपीठ व्हावे
By शोभना कांबळे | Published: September 20, 2023 04:42 PM2023-09-20T16:42:29+5:302023-09-20T16:42:51+5:30
शाेभना कांबळे, रत्नागिरी मंगळवारी विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे घराघरात आगमन हाेताच, गणेशभक्तांच्या उत्साहाला भरते आले. बाप्पाला डोळ्यात साठवून ठेवताना त्याला किती ...
शाेभना कांबळे, रत्नागिरी
मंगळवारी विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे घराघरात आगमन हाेताच, गणेशभक्तांच्या उत्साहाला भरते आले. बाप्पाला डोळ्यात साठवून ठेवताना त्याला किती बघू आणि किती नको, असे त्याला झाले आहे. आता शनिवारपर्यंत सकाळी आणि सायंकाळी सुवासिक वातावरणात बाप्पाच्या आरतीचा सोहळा होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी त्याचे आवडते उकडीचे मोदक तयार केले जाणार आहेत. त्यामुळे आता पाच दिवस त्याच्या आगमनाने घर भारल्यासारखे होणार आहे, हे सांगायलाच नको. या काळात गणपती उत्सवासाठी पै-पाहुणे यानिमित्ताने येतातच. पण, गणपती बघण्यासाठी आजुबाजुचे किंवा मित्र परिवारही येत असतो. या साऱ्यांमुळे घर भरलेले असते. म्हणूनच अशा या उत्सवांमध्ये विविध चांगल्या संवादांची देवाणघेवाण होण्याच्या दृष्टीने चांगली संधी असते. या संधीचा उपयोग गणेशभक्तांनी घेतल्यास सामाजिक प्रबोधनाचे काम आपोआपच होईल.
लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव किंवा सार्वजनिक शिवजयंती उत्सव करण्यामागचा उद्देश हाच होता की, या उत्सवाच्या माध्यमातून एकत्र येणाऱ्या लोकांमध्ये स्वातंत्र्य चळवळीबाबतचे प्रबोधन घडवून आणण्यास मदत होईल, याच उद्देशाने हे दोन उत्सव सुरू झाले आणि त्यामागे असलेला प्रबोधनाचा हेतू साध्यही झाला. त्यामुळे भारतीयांमध्ये परकीय शक्तींविराेधात लढा देण्याची मानसिकता त्यावेळच्या भारतीयांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळेच इंग्रजांविरोधात उभ्या राहिलेल्या या चळवळीला व्यापक स्वरूप आले. त्यामुळे इंग्रजांच्या हातून भारत मातेला मुक्त करण्यासाठी मोठा स्वातंत्र्य संग्राम उभा राहिला. तत्कालीन देशभक्तांच्या पाठीमागे सर्वच नागरिक उभे राहिल्याने स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला, हे सांगायलाच नको.
म्हणूनच हे उत्सव आताही प्रबोधनाचे व्यासपीठ बनले, तर अनेक चांगले संदेश आजुबाजुला देता येतील.
काही सार्वजनिक गणेशोत्सवात चांगल्या उपक्रमांचे आयोजन करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक सार्वजनिक मंडळे मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवतानाच लोकाेपयोगी, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करतात. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता मोहीम, शैक्षणिक शिबिरे आदी उपक्रम ठेवल्याने परिसरातील अनेक गरजू लोकांना याचा उपयोग होतो. शाळेतल्या मुलांसाठी विविध स्पर्धा ठेवल्या जातात. या निबंध, वक्तृत्व आणि अन्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मुले पुढे येतात. त्यामुळे गणेशोत्सव हे केवळ मनोरंजनाचे व्यासपीठ न ठरता खऱ्या अर्थाने बुद्धीच्या देवतेच्या साक्षीने विविध प्रबोधनाच्या कार्याचे व्यासपीठ करायला हवे. काही सरकारी विभाग अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती ठेवतात. मात्र, श्रीगणेशाच्या मूर्तीची नुसती पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना करून शेवटच्या दिवशी विसर्जन केले जाते. अशा ठिकाणी या कार्यालयाने आपल्या कार्यालयाच्या योजनांबरोबरच अन्य शासकीय योजनांचे फलक लावले तर ते खऱ्या अर्थाने फलद्रूप ठरतील. महिलांच्या विकासाच्या दृष्टीने अनेक उपक्रम आयोजित करता येण्यासारखे आहेत.
घरगुती गणेशाेत्सवाच्या माध्यमातूनही आपल्या भारतीय आदर्श संस्कृतीचे पोस्टर अथवा अन्य सजावटीतून करता येणे शक्य आहे. या उत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने आलेले आहेत. केवळ मनोरंजनाच्या कार्यक्रमात रमण्याऐवजी त्यांनी आपल्या गावाच्या - वाडीच्या समस्या जाणून घ्याव्यात. आपल्या परिसरात विकासाची कोणती कामे सुरू आहेत, कोणती आवश्यक आहेत, याबाबतही चर्चा करायला हवी. गणेशोत्सवात दिवसभर व्यग्र राहण्याऐवजी या उत्सवासाठी आल्यानंतर ही सुटीही गावाच्या विकासाच्या दृष्टीने सार्थकी लावता येईल. नाहीतर गणेशोत्सवासाठी चाकरमानी लगबगीने येतात आणि विसर्जन झाले की, तेवढ्याच लगबगीने कामाच्या ठिकाणी परतात. काही तर वर्षानेच पुन्हा उत्सवासाठी येतात. त्यामुळे गणेशोत्सव केवळ मनोरंजनाचे साधन बनविण्याऐवजी विधायक कार्यासाठी व्यासपीठ करण्यासाठी गणेश मंडळांनी आणि गणेशभक्तांनी पुढाकार घेतला तर उत्सवाचा हेतू खऱ्या अर्थाने साध्य होईल, असे म्हणावेसे वाटते.