बनावट गुणपत्रिका तयार करणारी टोळी गजाआड -रत्नागिरीत छडा : विद्यापीठातील चौघांसह सहाजणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:49 PM2018-10-13T23:49:30+5:302018-10-13T23:51:44+5:30
जिल्ह्यात बनावट गुणपत्रिका बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीत मुंबई विद्यापीठातील चार कर्मचाºयांचा समावेश आहे. बनावट गुणपत्रिका बनवून ही टोळी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळत होती. आतापर्यंत एकूण सहाजणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात बनावट गुणपत्रिका बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीत मुंबई विद्यापीठातील चार कर्मचाºयांचा समावेश आहे. बनावट गुणपत्रिका बनवून ही टोळी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळत होती. आतापर्यंत एकूण सहाजणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून आलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
रत्नागिरीतील सुयश नावाच्या विद्यार्थ्याने फिनोलेक्स महाविद्यालयात मॅकेनिकल शाखेत प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी दोन्ही सेमिस्टर मिळून १२ पैकी किमान ७ विषयांमध्ये विद्यार्थी पास झाला, तरच त्याला द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो; पण सुयश मात्र ५ विषयांमध्येच पास झाला. त्यामुळे द्वितीय वर्षाचा त्याचा प्रवेश खडतर झाला होता. द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी आणखी दोन विषयांत पास होणे आवश्यक होते; परंतु विषय सुटत नव्हते. अशातच सुयशने पेपर रिचेकिंगसाठी अर्ज केला होता. दरम्यानच्या काळात नापास झालेल्या विषयांसाठी पैसे भरून पास होता येते, अशी माहिती त्याला महाविद्यालयामध्येच सुरक्षारक्षक म्हणून काम करणाºया विनेश विश्वनाथ हळदणकर याच्याकडून मिळाली.
एका विषयात पास व्हायचे असेल तर ४५ हजार रुपये लागतील. दोन विषयांचे ९० हजार होतील, असे विनेशने सुयशला सांगितले. सुयशही यास तयार झाला. एवढे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्यासाठी आपल्याला बुलेट गाडी घ्यायची असे घरच्यांना सांगून सुरुवातीला त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यानंतर सुयशने विनेशला जवळपास ९७ हजार रुपये दिले. हे पैसे विनेशने विविध मार्गांनी मुंबई विद्यापीठात डाटा इन्ट्री आॅपरेटर म्हणून काम करणाºया गोरखनाथ गायकवाड यांच्याकडे दिले.
या टोळीमध्ये मुंबई विद्यापीठातील शिपाई प्रवीण वारीक, डाटा इन्ट्री आॅपरेटर महेश बागवे आणि विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील लिपिक गणेश गंगाराम मुणगेकर यांचा समावेश होता. त्यांच्यापर्यंत हे पैसे पोहोचले. गोरखनाथ गायकवाडला मुंबईत भेटून सुयशने आणखी काही पैसे दिले. एकूण एक लाख ३५ हजार रुपये सुयशने या टोळीकडे दिले. त्यानंतर सुयशला तो नापास झालेल्या दोन विषयांमध्ये पास झाल्याच्या दोन झेरॉक्स देण्यात आल्या. २०१८ -१९ मधील द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी सुयश महाविद्यालयात गेला; पण महाविद्यालयाकडून पात्र विद्यार्थ्यांची यादी अगोदरच तयार करण्यात आली होती. त्यात सुयशचे नाव कुठेच नव्हते. आपण रिचेकिंगमध्ये पास झालो असून, आपले नाव यादीत नसल्याचे सुयशने कॉलेजला सांगितले आणि इथेच सुयशचे बिंग फुटले.
तक्रार दाखल होताच पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कदम, पोलीस उपनिरीक्षक मढवी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आणि पहिल्यांदा सुयशला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुयशकडून विनेश हळदणकर आणि विनेशकडून मुंबई विद्यापीठातील गोरखनाथ गायकवाडची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या प्रकरणाचे आणखी धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर पोलिसांचे पथक मुंबईत गेले. या पथकाने मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील लिपिक गणेश मुणगेकर, शिपाई प्रवीण वारीक आणि महेश बागवे यांना ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता सहा झाली आहे.
गुणपत्रिकेतील तफावतीमुळे बिंग फुटले
महाविद्यालयाकडे विद्यापीठाकडून आलेले गुणपत्रिका आणि सुयशच्या गुणपत्रिकामधील गुणात तफावत जाणवली. त्यामुळे महाविद्यालयाने सुयशचे गुणपत्रिका विद्यापीठात तपासणीसाठी पाठविले. हे गुणपत्रिका विद्यापीठाच्या गुणपत्रिकाशी जुळत नसून, तुम्ही पोलिसांकडे तक्रार द्या, असे विद्यापीठाकडून फिनोलेक्स महाविद्यालयाला सांगण्यात आले. त्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.