वयाच्या ५९व्या वर्षीही ‘ते’ जोपासताहेत जाखडी, नमन लोककला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 07:20 PM2023-12-02T19:20:26+5:302023-12-02T19:21:03+5:30

अनिल कासारे लांजा : कोकणात जाखडी आणि नमन कलेची परंपरा आजही जोपासली जात आहे. या लोककलेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ...

Gangaram Neman Cultivated Jakhadi in Kuve, Naman Folk Art | वयाच्या ५९व्या वर्षीही ‘ते’ जोपासताहेत जाखडी, नमन लोककला

वयाच्या ५९व्या वर्षीही ‘ते’ जोपासताहेत जाखडी, नमन लोककला

अनिल कासारे

लांजा : कोकणात जाखडी आणि नमन कलेची परंपरा आजही जोपासली जात आहे. या लोककलेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असला तरी आजही पारंपरिक पद्धतीने ही कला जोपासण्याचे काम कुवे (ता. लांजा) येथील गंगाराम तुकाराम नेमण करत आहेत. वयाच्या ५९व्या वर्षीही नेमण ही कला उत्साहाने जोपासत आहेत. अगदी तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह असतो.

गंगाराम नेमण हे सदालाल घराण्याचे कृष्णा पानकर यांचे शिष्य आहेत. जाखडी आणि नमन कलेची त्यांना लहानपणापासून आवड हाेती. गावात जाखडी आणि नमन असले की ते उत्साहाने पाहायला जायचे. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी जाखडी कलेत फेर धरला. जाखडीचा फेर धरत असतानाच त्यांनी गुरूंकडून ज्ञानाचे धडे घेण्याचे ठरविले. जाखडी नृत्यात फेर धरता धरता त्यांनी स्वतः गीतगायन करण्याची कला अवगत केली. हळूहळू त्यांनी त्यातील बारकावे शिकून घेतले आणि जाखडी, नमन कलेला आपलेसे केले.

विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धेत त्यांनी आपला सहभाग दर्शवून समाजप्रबोधन करत गीते गायन करून रसिकांची मने जिंकली. त्यांनी देवधे-गुरववाडी, लांजा काळे छात्रालय, लांजा-आगरवाडी याठिकाणी हाेणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी हाेत रसिकांच्या मनात ठसा उमटवला. जाखडी तसेच नमन कलेत त्यांनी झोकून देत नमन लोककलेत विविध भूमिका साकारल्या. आपल्या विविध भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांना आपल्या कलेचे कौशल्य दाखविले आहे.

कलेचा वसा घेतलेले गंगाराम नेमण यांनी ५९ व्या वर्षीही ही कला जोपासली आहे. आतापर्यंत त्यांनी तुरेवाले शाहीर चंदू गुरव, गजानन तटकरे, प्रकाश बारगोडे, भानू झिमण, पिलाजी कोलगे अशा अनेक शाहिरांसोबत डबलबारीचे सामने केले आहेत. गणेश उत्सवात गावात अनेक ठिकाणी जाखडीचे कार्यक्रम सादर करून सर्वांची वाहवा मिळवली आहे.


जाखडी, नमन या काेकणातील पारंपरिक लाेककला आहेत. आजही या लाेककला जाेपासण्याचे काम अनेकजण करत आहेत. तरुणही आता ही कला जाेपासत आहेत. मात्र, आजवर पारंपरिक पद्धतीने लाेककला जाेपासणाऱ्या कलाकारांकडे दुर्लक्ष हाेत आहे. अजूनही अनेक कलाकार राजाश्रयापासून वंचित आहेत. त्यांचाही विचार हाेणे गरजेचे आहे. - गंगाराम नेमण, शाहीर.

Web Title: Gangaram Neman Cultivated Jakhadi in Kuve, Naman Folk Art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.