रत्नागिरीत तरुणाकडे सापडला ब्राऊन हिराेईनसह गांजा
By अरुण आडिवरेकर | Published: April 1, 2023 03:55 PM2023-04-01T15:55:04+5:302023-04-01T15:55:14+5:30
रेल्वे स्थानक परिसरात गांजा घेऊन विक्रीसाठी थांबला होता
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकानजिक असलेल्या कोकण प्लाझा समोर ब्राऊन हिरोईन या अंमली पदार्थासह गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला रत्नागिरी शहर पाेलिसांच्या पथकाने अटक केली आहे. साहिल हनिफ मेमन (२५, रा. झारणीरोड बाजारपेठ, रत्नागिरी) असे त्याचे नावे आहे.
त्याच्याकडून सुमारे ६१,४४० रुपयांचे ब्राऊन हिरोईन व १० हजार रुपयांचा गांजा असा ७१,४४० रुपयाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. तर साहिल मेमन याला अटक करण्यात आली असून, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहर पोलिसांचे गस्ती पथक पोलिस स्थानकाच्या हद्दीत तपासणी करत असताना गुरुवारी (दि.३०मार्च) रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. रेल्वे स्थानक परिसरात साहिल मेमन दुचाकीला लावलेल्या पिशवीत सुमारे ११ ग्रॅम वजनाचे ६१,४४० रुपये किंमतीचे ब्राऊन हिरोईन व ५१० ग्रॅम वजनाचा गांजा घेऊन विक्रीसाठी थांबला होता.
पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडील ७१,४४० रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहे. त्याचबराेबर त्याच्याकडील १५ हजार रुपयांची हाेंडा कंपनीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
साहिल मेमेन याच्या विरोधात एनडीपीएस कलम ८ (क) २० (ब) नुसार काल, शुक्रवारी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.