गणपत कदम समर्थकही शिवसेनेच्या वाटेवर...
By admin | Published: August 27, 2014 10:21 PM2014-08-27T22:21:32+5:302014-08-27T23:19:06+5:30
राजकारण तापले : काँग्रेसमध्ये राजकीय वादळाचे संकेत
राजापूर : नारायण राणेसमर्थक माजी आमदार गणपत कदम यांच्यापाठोपाठ त्यांचे असंख्य समर्थक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने तालुका काँग्रेसमध्ये राजकीय वादळ घोगाऊ लागले आहे. कदम राजापुरात दाखल झाले असून, लवकरच ते आपल्या समर्थकांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर सर्वांचा शिवसेना प्रवेश होईल.
नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून मधली नऊ वर्षे कदम हे ओळखले जात होते. राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याबरोबर कदम यांनी आपल्या आमदारकीचा त्याग करुन पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. मात्र, २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यानंतर खचून न जाता त्यांनी तालुका काँग्रेसचा डोलारा यशस्वीपणे सांभाळला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर नगर परिषदेमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करता आली होती. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसहीत ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला माफक यश मिळवता आले होते.
तथापि त्यांच्या कर्तृत्त्वाची दखल काँग्रेसकडून कधीच घेण्यात आली नाही. कदम यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर राज्य मंत्रिमंडळात किंवा एखाद्या महामंडळावर त्यांची वर्णी लागेल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून बाळगली जात होती. पण, काँग्रेसच्या अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून गणपत कदमांची उपेक्षा केली गेली. आपले कुठेतरी दखल घेतली जाईल, यासाठी नऊ वर्षे वाट पाहिली. पण, काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून शिवसेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा व माजी आमदार सुभाष बने यांचा शिवसेना प्रवेश पार पडला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उभय माजी आमदारांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश दिला.
काँग्रेसला दणका देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गणपत कदम राजापुरात दाखल झाले आहेत. लवकरच ते आपल्या समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतील. यानंतर या सर्वांचा शिवसेना प्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे.
काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने लवकरच काँग्रेसला दणका बसणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेने हे प्रवेशसोहळे पार पाडून काँग्रेसला खिंडीत पकडले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात राजापूर तालुक्यातील राजकीय वातावरणाचे रंग अधिकच गहिरे बनणार आहेत. (प्रतिनिधी)