गणपतीपुळे महाराष्ट्रातील ‘बेस्ट रिसोर्ट अँड बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 06:04 PM2022-05-14T18:04:34+5:302022-05-14T18:04:56+5:30

केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश आणि विदेशातील पर्यटकांची गणपतीपुळेला कायम पसंती मिळत असते. पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गणपतीपुळे येथे विविध सुविधा निर्माण केल्या आहेत.

Ganpatipule Maharashtra Best Resort and Best Review of the Year | गणपतीपुळे महाराष्ट्रातील ‘बेस्ट रिसोर्ट अँड बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’

गणपतीपुळे महाराष्ट्रातील ‘बेस्ट रिसोर्ट अँड बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’

googlenewsNext

शोभना कांबळे

रत्नागिरी : धार्मिक पर्यटन स्थळाबरोबरच पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेल्या गणपतीपुळेला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ‘बेस्ट रिसोर्ट ऑफ दि इयर’ तसेच ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’ जाहीर केले असून, गुहागर तालुक्यातील वेळणेश्वरलाही ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’चा गाैरव मिळाला आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या पर्यटन महामंडळाच्या आढावा बैठकीत जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी दिली.

केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश आणि विदेशातील पर्यटकांची गणपतीपुळेला कायम पसंती मिळत असते. पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गणपतीपुळे येथे विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचप्रमाणे बोट क्लबसारख्या जलक्रीडा सुरू केल्या आहेत. ‘वेडिंग - बर्थ डे डेस्टिनेशन’ म्हणूनही गणपतीपुळेत नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील आहे.

कोरोनाच्या काळात दोन वर्षे कोकणातील पर्यटनावर प्रतिकूल परिणाम झाला होता. मात्र, कोरोना कमी होताच डिसेंबर महिन्यात शासनाने नोव्हेंबर महिन्यात निर्बंध उठविले. पर्यटनात धार्मिक पर्यटनाचा महत्त्वाचा भाग असल्याने मंदिरे खुली करण्यास परवानगी मिळताच भाविकांनी गणपतीपुळे येथे गर्दी करण्यास सुरुवात केली. हिवाळी पर्यटन तसेच उन्हाळी पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल झाले. धार्मिकबरोबरच पर्यटन स्थळ म्हणूनही गणपतीपुळेला पर्यटकांनी अधिक पसंती दिली. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेले महाराष्ट्रातील गणपतीपुळे क्षेत्राला तसेच गुहागर तालुक्यातील वेळणेश्वरला एमटीडीसाने ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’ने गाैरविले आहे.

त्याचबरोबर २०२१- २२ या आर्थिक वर्षात एमटीडीसीला १ कोटी २० लाखांचा निव्वळ नफा मिळवून देणाऱ्या गणपतीपुळे रिसोर्टला ‘रिसोर्ट आॅफ दि इयर’चा गाैरव मिळाला आहे. ‘सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या रिसोर्ट’ तसेच इंटरनेटद्वारे उत्तम सुविधा उपलब्ध करून देणारे येथील व्यवस्थापक वैभव पाटील यांचाही सन्मान होणार आहे.

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर तसेच रायगड तालुक्यातील हरिहरेश्वर यांनाही बेस्ट ‘रिव्ह्यू ऑफ दि इयर’चा सन्मान मिळाला असून, या रिसोर्टचे व्यवस्थापक अनुक्रमे स्वप्नील पवार आणि सुभाष चव्हाण यांचाही सन्मान करण्यात आला आहे. तर कुणकेश्वर रिसार्टचे सिद्धेश चव्हाण यांना पदार्पणातच उत्तम काम केल्याबद्दल त्यांचाही सन्मान होणार आहे. महाराष्ट्रात कोकण पर्यटन विकास महामंडळ अव्वल ठरले असून, ही प्रशस्तीपत्रके काही दिवसांतच त्यांना प्रदान करण्यात येणार आहेत.

Web Title: Ganpatipule Maharashtra Best Resort and Best Review of the Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.