शहरातील कचरा समस्या बनलीय डोकेदुखी
By admin | Published: June 18, 2015 09:46 PM2015-06-18T21:46:58+5:302015-06-19T00:23:07+5:30
रत्नागिरी पालिका : पालिकेच्या सभा गाजवूनही समस्या ‘जैसे थे’च
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील कचऱ्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून, अद्याप ही समस्या सोडविण्यात पालिकेला यश आलेले नाही. एकीकडे साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंडमध्ये कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत, तर शहरातील कचराही वेळच्या वेळी उचलला जात नसल्याच्या प्रश्नावरून पंधरा दिवसांपूर्वीच्या सभेत नगराध्यक्षांना सर्वच सदस्यांनी घेरूनही शहरातील कचऱ्याची समस्या सुटलेली नाही. अनेक ठिकाणी घंटागाडीच जात नसल्याच्या तसेच कचरा आठ-आठ दिवस उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
रत्नागिरी शहर हे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असताना शहरात ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता आहे, त्यामध्ये शहर स्वच्छतेला महत्त्वाचे स्थान आहे. शहरात दररोज २२ टन कचरा तयार होतो. या कचऱ्याचे संकलन करून तो साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात टाकला जातो. ढीग जसे वाढत जातात तसे त्या ढीगांना आग लावून देण्याचे प्रकार सुरू होतात. मात्र, आग लावल्याने कचऱ्याचे ढीग काही कमी झालेले नाहीत. त्यातच घनकचरा प्रकल्पाचा विषय रखडला असल्याने कचऱ्याचे काय करावे, असा प्रश्न पालिका प्रशासनासमोरही आहे. पालिकेतील कारभारीही त्याबाबत आपली हतबलता दाखवित आहेत. परंतु ही हतबलता नागरिक अजून किती खपवून घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
घनकचरा प्रकल्पाचा विषय मार्गी लागलेला नाहीच, परंतु शहरातील कचरा संकलनाबाबतही योग्य नियोजन नसल्याने शहरात अनेक ठिकाणी कचराच उचलला जात नाही, ्र्रअशी स्थिती आहे. त्यामुळे सफाई कामगार काम करतात की नाहीत, सफाई कामगार पुरेसे आहेत की नाहीत, यांसारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. कागदोपत्री पालिकेकडे ६२ कायमस्वरुपी सफाई कामगार आहेत. शंभरपेक्षा अधिक कंत्राटी सफाई कामगार आहेत. कायम कामगारांमधील केवळ १७ ते १८ कामगारच हजर असतात. त्यामुळे शहर सफाईचे काम योग्यरित्या होणार कसे, असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
शहराचे २८ वॉर्ड असून, नवीन रचनेनुसार ७ प्रभाग करण्यात आले आहेत. शहरातील काही जवळच्या प्रभागात कचरा संकलनाचे काम होते. मात्र अन्य ठिकाणी कचराच उचलला जात नाही, अशा तक्रारी नागरिकांतून केल्या जात आहेत. नगरसेवकांनीही याच तक्रारी करूनही सफाईचे काम योग्यरित्या होत नसल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरी पालिकेत युतीची सत्ता आल्यानंतर प्रथम नगराध्यक्ष म्हणून आपण कारभार पाहताना शहरातील स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व दिले होते. सफाई कामगारांचे नियोजन योग्यरित्या झाले की नाही, याची आपण सकाळी ६ वाजल्यापासूनच स्वत: तपासणी करीत होतो. त्यामुळे त्यावेळी अत्यंत चांगल्या प्रकारे स्वच्छतेचे काम सुरू होते. आता सफाई कामगारांची संख्या किती व प्रत्यक्षात कामावर असतात किती, हा संशोधनाचा विषय आहे. स्वच्छतेचे काम योग्यरित्या होत नाही, हे सर्व नगरसेवकांचे म्हणणे योग्य आहे. कामात सुधारणा आवश्यक आहेत.
- मिलिंद कीर, नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, रत्नागिरी.