‘बाग’बगीचे की ‘बाद’बगीचे ?
By admin | Published: May 18, 2016 10:57 PM2016-05-18T22:57:20+5:302016-05-19T00:17:28+5:30
लाखोंचा खर्च : रत्नागिरी शहरातील अनेक उद्यानांची दुरवस्था; खेळणी मोडलेली
प्रकाश वराडकर-- रत्नागिरी -रत्नागिरी नगरपालिकेच्या अखत्यारीतील दोन उद्यानेवगळता अनेक उद्यानांची दुरवस्था झाली आहे. या उद्यानांमध्ये पालिकेने लाखो रुपये खर्च करून नवीन खेळणी काही काळापूर्वी उपलब्ध करून दिली आहेत. मात्र, त्यातील अनेक खेळणी, उद्यानातील साहित्य मोडतोड झोलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे हे ‘बाग’बगीचे की ‘बाद’बगीचे, असा सवाल निर्माण झाला आहे. उद्यानांमधील मोडलेल्या खेळण्यांची तातडीने दुरुस्ती करावी किवा नवीन खेळणी द्यावीत, अशी मागणी होत आहे. रत्नागिरी शहरात आरक्षणे असलेल्या पालिकेच्या जागेत सध्या ३६ उद्याने आहेत. त्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतपत उद्याने बऱ्यापैकी स्थितीत आहेत, तर त्यातील थिबा पॉर्इंट येथील जिजामाता उद्यान व मारुती मंदिरजवळील थत्ते तथा नव्याने नामकरण झालेले संसारे उद्यान यांची स्थिती चांगली आहे. मात्र, जिजामाता उद्यान हे व्यापारीतत्त्वावर चालविण्यास देण्यात आले आहे. त्यामुळे त्या उद्यानात प्रवेशासाठी शुल्क आकारले जाते. परंतु तेवढ्या सुविधा जिजामाता उद्यानात नसल्याने तेथे येणाऱ्या नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जिजामाता हे उद्यान रत्नागिरीचे भूषण मानले जाते. काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या उद्यानात अत्यंत चांगल्या दर्जाची खेळणी, कारंजी उभारण्यात आली होती. आजच्या घडीला या उद्यानातील खेळण्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यातील अनेक खेळणी बदलण्याची गरज आहे. परंतु कंत्राटी पध्दतीने हे उद्यान चालविण्यास दिल्याने या उद्यानाच्या दुरुस्ती देखभालीकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी व शहराचे भूषण असलेल्या या उद्यानाची ही स्थिती कधी सुधारणार, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
मारुती मंदिरजवळ मजगावरोडकडे जाताना थत्ते कंपाऊंडमध्ये शहरातील सध्याचे चांगले उद्यान उभारण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वीच या प्रभागातील नगरसेवक व माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांनी पुढाकार घेत या उद्यानाचे पूर्णत: नूतनीकरण केले. त्यासाठी कोटीपेक्षाही अधिक खर्च पालिकेच्यावतीने करण्यात आला. या उद्यानात कारंजी, खेळणी व अन्य साहित्य, शहरवासीयांसाठी बसण्यासाठी मुबलक बैठक व्यवस्था, तसेच कार्यक्रमासाठी व्यासीपीठ उभारण्यात आले. मात्र, याठिकाणी प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याने नागरिकांची गर्दी दिसून येते. परंतु गेल्या काही दिवसात नव्याने आणलेली खेळणी याठिकाणीही नादुरुस्त झाली आहेत. त्यांची दुरुस्ती आवश्यक बनली आहे.
जिजामाता व संसारे या उद्यानांचा अपवादवगळता अन्य उद्यानांमध्ये सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे. मात्र, अनेक उद्यानांमध्ये नवीन खेळणी आणल्यानंतर त्याची देखभाल होण्याची गरज आहे. मोडलेली, निखळलेली खेळणी तत्काळ दुरुस्त करणे आवश्यक आहे. शहरातील ही सर्वच उद्याने चांगल्या ठिकाणी आहेत. त्यामुळे ही सर्व उद्याने चांगल्या रुपात आणण्यासाठी व नागरिकांना चांगली उद्याने उपलब्ध होण्यासाठी विशेष योजना राबविण्याची गरज आहे.
नवीन प्रकल्प : थीमपार्क, पक्षी उद्यान, फुलपाखरू उद्यानांची प्रतीक्षाच
केंद्र सरकारच्या निधीतून रत्नागिरी शहरात थीमपार्क, पक्षी उद्यान, फुलपाखरू उद्यान, सर्प उद्यान तसेच जिजामाता उद्यानात अॅक्वेरियम उभारणे, याबाबत वर्षभरापूर्वी हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. या प्रकल्पांमध्ये देखभाालीसाठी स्थानिकांनाही सामावून घेण्याचा प्रस्ताव होता. केंद्र सरकारच या सर्व प्रकल्पांचा खर्च उचणार होते. प्रकल्प राबविण्याबाबत फुलोरा फाऊंडेशनशी बोलणी सुरू होती. याबाबत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर हे आग्रही होते. शहरात चांगल्या गोष्टी घडाव्यात, यासाठी त्यांचा प्रयत्न होता. मात्र, या प्रकल्पांबाबतची पुढील वाटचाल किती झाली व हे प्रकल्प कधी पूर्ण होणार, याची माहिती जनतेला अद्याप मिळालेली नाही.