महिलेच्या कष्टातून बागायत फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:37 AM2021-09-09T04:37:54+5:302021-09-09T04:37:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील अर्पणा अनिल विचारे यांनी गेल्या १५ वर्षांत अविरत कष्ट ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील अर्पणा अनिल विचारे यांनी गेल्या १५ वर्षांत अविरत कष्ट करून सहा एकर क्षेत्रावर बागायती फुलविली आहे. पावसाळी भात अवघ्या दहा गुंठ्यांवर करण्यात येत असले तरी त्यांनी बागायतीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सहा एकर क्षेत्रावर आंबा, काजू, नारळ, सुपारीची लागवड रोजगार हमी योजनेतून केली आहे. शिवाय नारळ सुपारी बागायतीमध्ये त्यांनी मसाला पिकांची आंतरलागवड केली आहे.
पती अनिल पोलीस दलात सेवेत असताना अपर्णा यांनी गावाकडील जागेवर बागायती विकसित केली आहे. आंबा-काजू हंगामात २०, तर अन्य दिवसांत दररोज दहा कामगारांना रोजगार त्यांच्याकडे प्राप्त झाला आहे. आंबा, काजू, सुपारी, नारळ विक्रीतून त्यांना उत्पन्न प्राप्त होत आहे. याशिवाय आंबा पोळी, लोणचे, कोकम सरबत, कैरी पावडर, वाळविलेली कैरी, आदी उत्पादने तयार करून त्याची विक्री करीत उत्पन्न मिळवीत आहेत.
सेवानिवृत्तीनंतर पतीची साथ
अनिल विचारे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनीही पत्नीला शेतीच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली आहे. सातशे हापूस कलमातून १३ टन आंबा, एक हजार काजू लागवडीमुळे दीड ते दोन टन काजू, १५० नारळ झाडांमुळे एक हजार नारळ, १५० पोफळीतून १०० किलो सुपारी प्राप्त होत आहे. आंबा मुंबई, पुणे मार्केट, तसेच खासगी विक्री करीत आहेत. नारळ व सुपारीमध्ये काळीमिरी, जायफळ, दालचिनी, कडीपत्ता लागवड केली आहे. मात्र, लवकरच मसाला पिकांचे उत्पन्न सुरू होणार आहे.
प्रक्रिया उद्योगावर भर
आंबा कच्चा व पिकलेला विक्री करीत असतानाच अपर्णा यांनी मोजक्या प्रक्रिया उद्योगावर भर दिला आहे. दरवर्षी दीडशे ते दोनशे किलो लोणचे, ४० किलो आंबा पोळी, शंभर लिटर कोकम सरबत, वीस किलो कैरी पावडर, ४० किलो वाळविलेल्या कैरी फाेंडीची विक्री करीत आहेत. आंबा हंगामात तर त्यांच्याकडे वीस लोकांना दररोज रोजगार प्राप्त होत आहे.
विहिरीला मुबलक पाणी
विचारे यांच्या बागेलगत २००७-०८ साली कृषी बंधारा बांधला आहे. त्यामुळे त्यांच्या बागेतील विहिरीला मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध आहे. मुबलक पाण्यावर बागायती चांगली फुलली आहे. खत व्यवस्थापनापासून फळ काढणीपश्चात विक्री, तसेच उत्पादन निर्मितीसह विक्रीकडे विचारे दाम्पत्य परिश्रम घेत आहेत.
कृषी विभागाचे सहकार्य
अपर्णा यांना शेतीची आवड असल्याने त्या सतत कामात व्यस्त असतात; परंतु लागवडीपासून खते, कीटकनाशकांचा वापर, तसेच हवामानातील बदलामुळे पिकावर होणारे परिणाम याबाबत त्या सतत बारकाईने अभ्यास करतात. त्यांना तालुका कृषी विभागासह मंडळ कृषी अधिकारी व्ही. एस. अवेरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.