अॅन्टिजन करणाऱ्यांची गर्ग यांनी केली विचारपूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:31 AM2021-04-21T04:31:57+5:302021-04-21T04:31:57+5:30
रत्नागिरी : कोरोनाकाळात विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसावा यासाठी पोलीस यंत्रणेकडून अशा लोकांची अॅन्टिजन चाचणी करण्यात येत आहे. यासाठी दिवसभर ...
रत्नागिरी : कोरोनाकाळात विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसावा यासाठी पोलीस यंत्रणेकडून अशा लोकांची अॅन्टिजन चाचणी करण्यात येत आहे. यासाठी दिवसभर उन्हात काम करणाऱ्या पथकाची सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी भेट घेत त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत विचारपूस केली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रुग्णसंख्या जलद गतीने वाढू लागली आहे. त्यांना थोपवण्यासाठी पोलीस यंत्रणा पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. सध्या पोलीस दल २४ तास कार्यरत आहे. लॉकडाऊन असतानाही काही नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत, अशांना रोखण्यासाठी कारवाईचा बडगा उगारताना व त्यांच्या कोरोना चाचण्या सक्तीने केल्या जात आहे.
अशा लोकांची अॅन्टिजन चाचणी करणारे पथक शहरातील मारुती मंदिर, मिरकरवाडा, धनजी नाका, कोकणनगर या ठिकाणी डॉक्टर, शिक्षक आदींचे पथक सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लोकांचे अॅन्टिजन टेस्ट करण्याचे काम करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम अविश्रांत सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी सोमवारी शहरातील नाकाबंदी असलेल्या ठिकाणांना भेट देतानाच या पथकातील डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांची आस्थेने चौकशी केली. खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आपली दखल घेतल्याबद्दल त्यांचा चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता.
..................
विनाकारण फिरणाऱ्या लोकांची पोलीस दलामार्फत अॅन्टिजन टेस्ट करण्यात येत आहे. या ठिकाणी असलेल्या आरोग्य पथकास पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी भेट देऊन विचारपूस केली.